मनपाकडून स्वच्छता मोहिम, मोडकळीस आलेल्या आसनव्यवस्थेकडे लक्ष देणार का?
बेळगाव: मनपाकडून बस थांब्यांची सुरु असलेली स्वच्छता
प्रतिनिधी / बेळगाव
शहरामध्ये महानगर पालिका व स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रवाशांसाठी ठिकठिकाणी बस थांबे उभारण्यात आले आहेत. या बस थांब्यांच्या देखभालीकडे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करण्यात आले होते. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने बस थांब्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या बस थांब्यांचे अखेर भाग्य उजळले असेच म्हणावे लागेल.
शहरामध्ये महानगर पालिका व स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनेक ठिकाणी बस थांबे उभारण्यात आले. मात्र या बस थांब्यांच्या देखभालीकडे मनपाकडून साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बस थांबे मोडकळीस आले आहेत. तर सुशोभित करण्यात आलेल्या बस थांब्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. बस थांब्यांवर जाहिरीतीची भित्तीपत्रके चिकटविण्यात आली आहेत.
त्यामुळे बस थांब्यांचे विद्रुपीकरण झाले आहे. अशा बस थांब्यांमध्ये झालेल्या केरकचऱ्याकडेही साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यातच जनावरांचाही वावर असतो. त्यामुळे बसथांबे असून अडचण नसून खोळंबा झाले आहे. अशामध्ये महानगर पालिकेकडून बऱ्याच दिवसानंतर स्वच्छता करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मनपाकडे असणाऱ्या स्वच्छता वाहनांच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करून बस थांबे स्वच्छ करण्यात येत आहेत. त्यामुळे बस थांब्यांचे भाग्य उजळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बस थांब्यातील मोडलेल्या आसनांकडे लक्ष द्या?
कॉलेज रोडसह शहरातील बहुतांश बस थांब्यामधील आसन व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे बस थांब्यावर प्रवाशांना उभे राहूनच बसची प्रतिक्षा करावी लागते, याकडे मनपा आयुक्त लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.