नगरसेवक सगुण नाईक यांचा पुढाकार : पालखी मिरवणूक मार्ग साफ करण्याचे काम
प्रतिनिधी /मडगाव
मडगावचा दिंडी उत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. मागील दोन वर्षे कोविडमुळे पालखी मिरवणुकीत खंड पडला असला, तरी यंदा ही मिरवणूक होणार असल्याने आपल्या प्रभागातील पालखी मिरवणूक मार्गावर कचरा पडून राहणार नाही व सभोवतालील परिसर स्वच्छ राहील याची खबरदारी घेताना कोंब येथील प्रभाग 12 चे नगरसेवक सगुण उर्फ दादा नाईक यांनी प्रभाग परिसर चकाचक करण्याचे काम हाती घेतले आहे.
आपण आबाद फारिया रस्ता तसेच कोंब विठ्ठल मंदिर व सभोवतालील परिसरात साफसफाई हाती घेऊन बहुतेक परिसर स्वच्छ केला असल्याचे नगरसेवक नाईक यांनी सांगितले. हरी मंदिर येथील दिंडी उत्सवात काढण्यात येणारी पालखी मिरवणूक कोंब परिसरात येत असते. त्यामुळे मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या कडेला पावसाळ्यात साचून राहिलेला पालापाचोळा व अन्य कचरा हटविण्यासाठी पालिकेचे कामगार आणि अन्य यंत्रणा घेऊन साफसफाई करण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आबाद फारिया रोड येथे फेरी भरत असते. या ठिकाणची साफसफाई पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. कोंब विठ्ठल मंदिर परिसरात भक्तांची गर्दी असते. येथे गायन व अन्य कार्यक्रम होत असतात. त्यामुळे या परिसराची साफसफाई पालिकेकडून हाती घेण्यात आल्याचे नगरसेवक नाईक यांनी सांगितले.









