बेळगाव : राज्य सरकारच्या सूचनेवरून रविवारी सुटीच्या दिवशी बेळगाव तालुका पंचायत कार्यालयाची साफसफाई करण्यात आली. तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी यशवंतकुमार यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:हून कार्यालय व परिसराची स्वच्छता केली. दर महिन्यातून एकदा सरकारी कार्यालयांची स्वच्छता करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे विविध कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी स्वत: पुढाकार घेत सफाई मोहिमा राबवत आहेत. त्यानुसार बेळगाव तालुका पंचायतीत देखील रविवारी सुटीच्या दिवशी अधिकारी व कर्मचारी हजर होते. स्वत: तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी यशवंतकुमार उपस्थित होते. गेल्या दीड महिन्यापूर्वीच त्यांनी तालुका पंचायतीचा कारभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते म्हैसूर येथे कार्यरत होते. मात्र, त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडून बेळगाव तालुक्याची माहिती जाणून घेत काम सुरू ठेवले आहे.
सरकारच्या आदेशानुसार राबविली मोहीम
सरकारच्या आदेशानुसार सकाळपासून तालुका पंचायत कार्यालय व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व कक्षातील जुन्या फाईली व्यवस्थित करण्यात आल्या. तसेच आजूबाजूचा परिसर झाडलोट करून स्वच्छ करण्यात आला. महिनाभरापूर्वी देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.









