आमदार असिफ सेठ : मनपातर्फे सफाई कर्मचारी दिन साजरा
बेळगाव : सफाई कर्मचारी पहाटे 4 वाजता उठून शहर व परिसराची स्वच्छता करतात. ते फ्रंट वॉरियर्स आहेत. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे प्रशंसोद्गार आमदार असिफ सेठ यांनी काढले. मंगळवारी महानगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचारी दिनाचे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी., सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, सफाई कर्मचारी हितरक्षण समितीचे माजी नगरसेवक दीपक वाघेला, विनय निरगट्टी आदी उपस्थित होते. सफाई कर्मचारी दिनानिमित्त दोन दिवस विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विजयी झालेल्या संघांना व खेळाडूंना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना आमदार असिफ सेठ म्हणाले, सफाई कर्मचारी स्वच्छता कामासाठी पहाटे घरातून बाहेर पडतात.
त्यानंतर दिवसभर कचरा उचलण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. त्यांच्यामुळेच आज आपला परिसर स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमीच असून ते फ्रंट वॉरियर्स आहेत, असे ते म्हणाले. महापौर मंगेश पवार म्हणाले, महानगरपालिकेकडून लवकरच 134 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाणार आहे. त्यामुळे भरतीच्या आमिषाने कोणीही कोणाला पैसे देऊ नयेत. सरकारकडून ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. मनपा आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, सफाई कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने शहर स्वच्छतेचे काम करावे. सरकारकडून येणाऱ्या सर्व सोयीसुविधा आम्ही तुम्हाला देत आहोत. भविष्यातही सफाई कर्मचाऱ्यांनी अशाच पद्धतीने सहकार्य करावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना पँट-शर्ट तर महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी-ब्लाऊजचे वितरण करण्यात आले.









