मनपा-कॅन्टोन्मेंट प्रशासन खडबडून जागे : साचलेले कचऱ्याचे ढिगारे हटविले
बेळगाव : स्मार्ट बसथांब्यांची देखभाल करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ई-टॉयलेटची दुरवस्था झाल्याने कचराकुंडीचे स्वऊप आले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच मनपा व कॅन्टोन्मेंट प्रशासन खडबडून जागे झाले असून स्मार्ट बसथांब्यांची स्वच्छता करून साचलेले कचऱ्याचे ढिगारे हटविले. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच स्वच्छता मोहीम राबविली जाते. स्वच्छता करण्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंट अथवा महापालिकेची नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्मार्ट बसथांब्यांसाठी लाखो ऊपयांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या स्मार्ट बसथांब्यांच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे मनपा तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे. बसथांब्यांवर कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी उभारण्यात आलेल्या ई टॉयलेटला नळजोडणी आणि ड्रेनेज जोडणी करण्यात आली नसल्याने ई-टॉयलेट वापराविना धूळखात पडले आहे. ई-टॉयलेटसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पूर्णपणे वाया गेला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा विचार करून ई-टॉयलेटची उभारणी करण्यात आली. पण महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने स्मार्ट बसथांब्यांची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. विशेषत: धर्मवीर संभाजी चौकसह विविध ठिकाणी असलेल्या ई-टॉयलेटच्या देखभालीकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला आहे. नळजोडणी आणि ड्रेनेज जोडणी करण्यात आली नसल्याने खर्ची घातलेला निधी वाया गेल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या वृत्ताची दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डने स्मार्ट बसथांबा आणि ई-टॉयलेट शेजारी असलेल्या कचऱ्याची उचल केली. परिसर स्वच्छ बनविला. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कॅन्टोन्मेंटकडून स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली. पण ई-टॉयलेटची स्वच्छता नियमितपणे करण्याची जबाबदारी महापालिका किंवा कॅन्टोन्मेंटची नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट व महापालिकेने आपली जबाबदारी ओळखून कार्यरत रहावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









