गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून काम हाती : गणेशभक्तातून समाधान
बेळगाव : गणेशोत्सव केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून आवश्यक तयारी केली जात आहे. सार्वजनिक श्रीमूर्ती विसर्जन केल्या जाणाऱ्या तलावांची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यावर भर देण्यात आला आहे. कपिलतीर्थ तलावाबरोबरच जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावाचीही स्वच्छता करून तलावात नवीन पाणी सोडले जात आहे. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी शहर व उपनगरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, खाली लोंबकळणाऱ्या वीजतारा बदलण्यात याव्यात, तसेच रस्त्यावर अडथळे ठरणारे वीजखांब हटविण्यात यावेत, धोकादायक झाडे व फांद्या तोडाव्यात. तसेच सार्वजनिक श्रीमूर्ती विसर्जन केल्या जाणाऱ्या तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी व विद्युतरोषणाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार महापालिकेच्यावतीने तलावांच्या स्वच्छता कामासह रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात 24 तास पिण्याचे पाणी योजनेसाठी एलअँडटीकडून गल्लीबोळात खोदकाम करण्यात आले आहे. त्या चरीदेखील आता एलअँडटीकडून बुजविल्या जात आहेत. पण रस्त्यावरील खड्डे अद्याप बुजविण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. अलीकडेच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मनपा आयुक्त शुभा बी. यांना शहरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लवकरच खड्डे बुजविण्याचे कामही सुरू होण्याची शक्यता आहे. कपिलतीर्थ तलावाची स्वच्छता, रंगरंगोटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्याचबरोबर जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावाची स्वच्छताही केली जात असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









