उचल नसल्याने गटारी-नाल्यामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट : कारवाई करणार कोण?
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरातील कचऱ्याची उचल घरोघरी जाऊन करण्यात येत असल्याचा दावा महापालिका आणि पॅन्टोन्मेंटकडून करण्यात येतो. पण कोनवाळ गल्ली नाला स्वच्छतेवेळी मोठ्याप्रमाणात कचरा काढण्यात आला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येत असल्याचा दावा फोल ठरला आहे. कचऱ्याची उचल होत नसल्याने गटारी आणि नाल्यामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वच्छ भारत योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. याअंतर्गत शहरातील कचराकुंड्या हटवून कचरामुक्त शहर करण्यात येत आहे. शहरात स्वच्छता करण्यात येत असल्यामुळे रस्ते कचरामुक्त होत आहेत. मात्र नाले कचऱ्याने भरले आहेत. विशेषत: कोनवाळ नाला पॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून वाहतो, तसेच महापालिका व्याप्तीमधून बळळारी नाल्याला पोहचतो. मात्र कोनवाळ गल्ली परिसरात नाला कचऱ्याने तुंडूब भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वषी नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी नालाकाठावरील घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. अशी परिस्थिती निर्माण होवू नये याकरिता नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. कोनवाळ गल्ली नाला तुंडूब भरल्याने कचऱ्याच्या विळख्यात अडकला होता. त्यामुळे नाला स्वच्छता करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने कचरा नाल्यामधून काढण्यात आला.
कचऱ्याचे प्रमाण पाहता, घरोघरी जाऊन कचरा गोळा करूनही नाल्यात मोठ्याप्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. नाला आणि गटारीमध्ये कचरा टाकण्यात येऊ नये, असे आवाहन करूनही कचरा टाकण्यात येत असल्याने नाला तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. पॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमधील कचरा नाल्यात टाकत असल्याचा दावा मनपाच्यावतीने करण्यात येत आहे. पण नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









