पावसाळय़ापूर्वी नियोजन करणे आवश्यक : आतापासून प्रशासन कामाला लागल्यास पातळीत होऊ शकते वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन ते तीन वर्षांपासून पाणीटंचाई कमी जाणवत आहे. याला कारण म्हणजे विपुल प्रमाणात पडणारा पाऊस. पाण्याची पातळी वाढवायची असेल तर त्यासाठी नदी, नाले व तलावांना जोडणाऱया कालव्यांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळय़ापूर्वी नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळय़ात पाणीसाठा केला जात नाही अथवा तेव्हा प्रशासनाला शहाणपण सुचत नाही. मात्र उन्हाळय़ात पाण्याच्या नियोजनाचे गोडवे गातात. त्या दृष्टिने प्रशासनाने आतापासून पाण्याचे नियोजन केल्यास याची भीती उन्हाळय़ात राहणारच नाही. कालव्यांची स्वच्छता करुन ते पाणी तलावांत वळविल्यास ते जमिनीत झिरपून पाणीपातळी वाढविण्यास मदत होते. मात्र प्रशासनाला उशिरा शहाणपण येऊनही याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. पावसाचे पाणी वाया जाऊ न देता ते अडवून कालव्यांद्वारे तलावामध्ये सोडण्यासाठी कालव्यांची खोदाई करण्याची गरज आहे. यासाठी विविध संघ-संस्थांनी वारंवार आवाज उठविला आहे. मात्र त्याकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
कालव्यांची स्वच्छता नसल्यामुळे पाणीसाठा होण्यास अडचण
नाले व कालव्यांद्वारे पाणी तलावात गेल्यास त्याचा फायदा उन्हाळ्य़ामध्ये होतो. हे गृहित धरुन अनेक कालव्यांची निर्मिती केली. मात्र त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यात न आल्यामुळे ते सध्या वाया जात असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा ज्या तलावांना कालवे नाहीत किंवा कालवे बुजले आहेत, त्यांची खोदाई केल्यास येत्या समस्यांवर मात करण्यास काही प्रमाणात मदत होते. कमी पाऊस व त्यावर दुष्काळी परिस्थिती यामुळे सारेच हैराण होत आहेत. त्यातच कालव्यांची अस्वच्छता असल्यामुळे पाणीसाठा होण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे.
अनेक कालवे बुजण्याच्या मार्गावर
जिह्यातील अनेक तलाव पाण्याअभावी कोरडे झाले आहेत. त्यातच चाऱयाचा प्रश्न गंभीर होत असताना याकडे जिल्हा प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान अनेक कालवे बुजण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची स्वच्छता केल्यास पाणीसाठा होण्यास मदत मिळणार आहे. यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे मत अनेकांतून व्यक्त होत आहे. ज्या ग्राम पंचायत हद्दीत विविध तलाव व कालवे येतात त्यांनी तातडीने त्या कालव्यांच्या कामांना चालना देण्याची गरज आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना यशस्वी करायची असल्यास कालव्यांची खोदाई करुन त्यातील पाणी तलावात कसे जाईल, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. या कामांना लवकरात लवकर चालना मिळाली तर पुढील संकट काही अंशी कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. कालव्यांची खोदाई करताना तलावांना धोका पोहचू नये याची काळजी घेणेही गरजेचे असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे. मागील काही वर्षांपासून उद्योग खात्रीतून अनेक कालव्यांना पुनरुज्जीवन मिळाले आहे. मात्र अजूनही पाणीसाठा होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पावसाळय़ात वाया जाणारे पाणी अडविण्याची गरज
पावसाळ्यापूर्वी हे कालवे स्वच्छ करणे गरजेचे आहे. यासाठी तातडीने आराखडा तयार करून कामाला लागण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचे नियोजन हवे असल्यास कालव्यांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पाणीसाठा होत नसल्याने व खोदाई करण्यात आलेल्या तलावांमध्ये पाणी न थांबल्याने विहिरी, कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. पावसाळ्यात डोंगर व इतर भागातून आलेले पाणी तलावाऐवजी इतर परिसरात वाया जात आहे. त्यामुळे योग्य नियोजनाची गरज आहे.









