राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल: ‘सत्याचा मोर्चा’मधून उद्धव ठाकरे, शरद पवार यांचीही जोरदार टीका
मुंबई : प्रतिनिधी
मतदारयादीतील दुबार नावे आणि गोंधळ दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्पे शनिवारी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांसह आघाडीतील प्रमुख नेते सहभागी झाले. मोर्चाची सुरुवात फॅशन स्ट्रीटवरून झाली . मोर्चा मेट्रो मार्गे बीएमसी मुख्यालयापर्यंत काढण्यात आला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून ‘लोकशाही वाचवा’ आणि ‘मतदारयादी स्वच्छ करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘मतदारयादीत हजारो दुबार नावे आहेत. माझ्याकडे साडेचार हजार मतदारांचे पुरावे आहेत, जे दोन वेगवेगळ्या मतदारसंघांत मतदान करतात. निवडणुका घाईघाईत घेऊ नका, आधी यादी स्वच्छ करा,’ असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. सर्वच पक्ष दुबार मतदार आहेत, असे म्हणत आहेत. भाजपचे लोकही मतदार दुबार आहेत, असे म्हणत आहे. सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वच जण दुबार मतदार असल्याचे सांगत असतील तर त्यात बदल होणे अपेक्षित आहे.
मतदारयादी सुधारणे आवश्यक आहे. आता गेली तीन वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. मग आणखी कालावधी लोटला तर बिघडला कुठे? मतदारयाद्या स्वच्छ होण्यासाठीच तर निवडणूक पुढे ढकला अशी मागणी होत आहे. पण गैरमार्गाने निवडून येणाऱ्यांना ते नको आहे. कारण त्यांचे सत्तेचे मार्ग बंद होतील, ही भीती आहे. दुबार मतदारांचा आरोप केला तर पुरावा द्या, असे सांगितले जाते. आता मतदार यादी जुलैला बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवत दुबार मतदारनोंदणीचा बॉम्बच टाकला.
दुबार मतदारांना फोडून काढा
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खास निर्देश देताना सांगितले, मतदानाच्या वेळी घराघरात जाऊन पाहणी करा, लोकांना समजावून सांगा; कोण घरात राहतं, कोणती माणसं आहेत, हे बघा; आणि जेव्हा कधी निवडणूक होतील तेव्हा जर दुबार मतदार आले तर त्यांना तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा थेट आदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
पैठणचे आमदार विलास भुमरे यांचा संदर्भ देत म्हटले, त्यांनी स्वत: त्यांच्या मतदारसंघातही 20 लाखाहून अधिक मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार आहेत असे कबूल केले आहे. यामुळेच 232 आमदार निवडून आल्यानंतरही मातम सदृश्य वातावरण निवडणुकीनंतर बघायला मिळालं होतं. काही विजयी उमेदवारांनी तर स्वत:ला चिमटे काढून बघितले होते. हे असं सगळं सुरू आहे. याला काय निवडणुका म्हणतात का?हा मतदारांच्या मतांचा अपमान आहे, मॅच फिक्स आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
निवडणुका घेणे लोकशाहीचा अपमान : उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीच्या ‘सत्याचा मोर्चा’त उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल करत कठोर शब्दांत इशारा दिला. मतदारयादीत इतका गोंधळ असताना निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. आज आपण रस्त्यावर उतरलो आहोत, कारण लोकशाही वाचवायची आहे, सत्ता मिळवायची नाही.आयोगाने मतदारयाद्यांची तातडीने तपासणी करावी, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आयोगाला दिला.
आपल्या कुटुंबातील नावे हटवण्याचा आरोप
उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावरून मतदार यादीतील नावे हटवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतदारयादीतील नाव पडताळणीसाठी माझ्या नावाने ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. हा अर्ज 23 तारखेला ‘सक्षम’ नावाच्या अॅपवरून दाखल करण्यात आला. याचा अर्थ माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी मागवण्याचा आणि माहिती हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्यासकट कुटुंबातील चार जणांची नावे मतदारयादीतून वगळण्याचा डाव रचला गेला असावा, असा संशय व्यक्त केला.
कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?
मुंबई उत्तर पूर्व 92,983 दुबार मतदार
उत्तर मध्ये 63,740 दुबार मतदार
दक्षिण मध्ये 50,565 दुबार मतदार
दक्षिण मुंबई 55,205 दुबार मतदार
नाशिक लोकसभा 99,673 दुबार मतदार
मावळ 1,45,636 दुबार मतदार .
फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळा : भाजप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे. आघाडीचे भ्रम निर्माण करण्याचे डाव हाणून पाडण्यासाठी, मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी शनिवारी गिरगाव चौपाटी येथे मूक आंदोलन करण्यात आले. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर, आमदार संजय उपाध्याय आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
ठाकरे बंधु दिशाभूल करत आहे.
ठाकरे बंधूंवर निशाणा साधत चव्हाण म्हणाले, हे बंधू वक्तफत्वशैलीच्या बळावर जनतेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरून भावनिक आवाहनांमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल करत आले आहेत. महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूंनी दाखवले. राज्यात महायुती सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्यासाठी होत असलेले प्रकल्प, योजना याकडे डोळे उघडे ठेवून पहा असे आवाहन चव्हाण यांनी केले.








