फातोर्डा गट काँग्रेसने दिला इशारा
मडगाव : मडगावचे एसजीपीडीए मार्केट एकदम गलिच्छ बनले आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. हे मार्केट आरोग्याच्या दृष्टीकोनातून धोकादायक बनले आहे. पीडीए व मडगाव पालिकेचे याकडे दुर्लक्ष केला आहे. जर 15 दिवसांच्या आत या मार्केटची स्वच्छता केली नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठाऊ, असा इशारा फातोर्डा गट काँग्रेसने दिला आहे. एसजीपीडीए मार्केटला सुमारे 25 वर्षे झाली असून त्याचा दर्जा उंचावण्यावर भर दिलेला नाही. त्यामुळे हे मार्केट समस्यांचे आगर बनले आहे. हे मार्केट दक्षिण गोव्यातील प्रमुख मार्केट असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखेच आहे, असे मत प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले.
पीडीए बरखास्त करा
संविधानात पीडीएचा कुठेच संदर्भ नाही. जर पीडीए सर्व सामान्याना न्याय देऊ शकत नसेल तर सर्व पीडीए बरखास्त करा, अशी मागणी एल्विस गोम्स यांनी केली. पीडीएच्या अधिकाऱ्यांनी एसी कॅबिनमध्ये बसून न राहता, प्रत्यक्ष मार्केटाची पहाणी केल्यास त्यांना सत्य परिस्थिती कळेल. जेव्हा अधिकारी प्रत्यक्ष भेट देतील, तेव्हाच त्यांना विषयाचे गांभीर्य कळणार असल्याचे मत गोम्स यांनी मांडले. मार्केटच्या आतील तसेच बाहेरच्या भाग गलिच्छ झालेला आहे. या ठिकाणी किडे पडलेले आहेत. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर नक्कीच सांसर्गीक रोगराई पसरणार असल्याची भीती योगेश नागवेकर यांनी व्यक्त केली.









