शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाईप खुल्या करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातून जाणारा लेंडी नाला आणि शेतकऱ्यांना शाप ठरलेला बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, या मागणीसाठी शहर शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या नाल्यांचे पाणी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाईप खुल्या करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून आपण आराखडा तयार केला असून त्यासाठी पाठपुरावा करू, असे यावेळी सांगितले.
लेंडीनाला, बळ्ळारी नाला साफ न केल्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. याचबरोबर शहरालादेखील पुराचा फटका बसत आहे. तेव्हा प्रशासनाने सारासार अभ्यास करावा आणि तातडीने या दोन्ही नाल्यांची खोदाई करण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्गावर बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याचे पाणी निचरा करण्यासाठी पाईप घालण्यात आले आहेत. ते पाईप पूर्णपणे बुजले आहेत. ते प्रथम खुले करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
शेतकऱ्यांचे दरवर्षी एकरी 1 लाख रुपयाचे नुकसान होत आहे. मात्र त्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. जवळपास 1 हजार एकरमधील पिके दरवर्षी वाया जात आहेत. शेती हा या परिसरातील जनतेचा कणा आहे. मात्र दरवर्षी पावसामुळे फटका बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शहराला पूर येत आहे. शहराला पूर येण्याचे कारण हे राष्ट्रीय महामार्गाचे पाईप असल्याचेही सांगण्यात आले. तेव्हा नाल्याची खोदाई केलीच पाहिजे. याचबरोबर पाईपही खुले केले पाहिजेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव व इतर शेतकरी उपस्थित होते.









