मनपा बांधकाम स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : गैरहजर अधिकाऱ्यांना बजावणार नोटीस, अतिक्रमण हटविण्याचेही आदेश
बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण व्हावे, यासाठी पुढील आठवड्यापासूनच सफाईच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी सूचना बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावेळी 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बांधकाम स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयतीर्थ सवदत्ती होते. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी उपस्थितांचे स्वागत करत विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. यावेळी चर्चा करून विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. प्रामुख्याने शहरातील नाल्यांच्या सफाईच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील बळ्ळारी नाला, नागझरी नाला त्याचबरोबर इतर नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेणे जरुरीचे आहे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले.
पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई केल्यास सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होणार नाहीत. त्यामुळे तातडीने पुढील आठवड्यापासून शहरातील सर्व नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेण्यात यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्याचबरोबर बफर झोनवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली. काँग्रेस रोड ते शिवाजी महाराज उद्यानापर्यंतच्या रोडवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्याचबरोबर बफर झोनची सिटी सर्व्हे, बुडा आणि महापालिकेच्यावतीने संयुक्तरित्या सर्व्हे करून मोजमाप करण्यात येणार असल्याचेही सांगितले. नाल्यांची सफाई किती वेळा केली जाते? अशी विचारणा सदस्यांनी केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर अशी दोन वेळा नाल्यांची सफाई करण्यात येते, असेही सांगण्यात आले. मात्र, पावसाळ्यात नाल्याच्या ठिकाणी वाहने जाणे अवघड आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची व्यवस्थितरित्या सफाई करण्याची सूचना करण्यात आली.
अधिकाऱ्यांची पुन्हा दांडी
महापालिकेच्या विविध स्थायी समितींच्या बैठकांची कौन्सिल विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांना आगाऊ नोटीस दिली जाते. मात्र, प्रत्येक वेळी विविध विभागांचे अधिकारी बैठकीला दांडी मारत आहेत. शुक्रवारच्या बांधकाम स्थायी समितीची बैठक सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, 11.30 वाजले तरी बहुतांश अधिकारी बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे याबाबत अध्यक्ष व सदस्यांनी संताप व्यक्त करत गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना कौन्सिल सेक्रेटरींना केली.









