महानगरपालिका सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांची मागणी : कोनवाळ गल्ली येथील नाला धोकादायक
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि गटारींची सफाई करण्याची मागणी शनिवारच्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी केली. विशेषकरून कोनवाळ गल्ली आणि खासबाग येथील नाला सफाई, त्याचबरोबर महात्मा फुले रोड आणि नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारींवरील काँक्रिट हटवून स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली.
कोनवाळ गल्ली येथील नाला धोकादायक बनला असून सदर नाला केव्हा कोसळेल सांगता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्याची स्वच्छता करण्यासह नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. सदर नाल्याची अधिकाऱ्यांनी पाहणी करूनदेखील त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे महापालिका एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा आरोप नगरसेवकांनी केला. त्यानंतर अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी नाल्याच्या बांधकामासाठी आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले. आराखडा तयार करण्यात आला असला तरी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल का? अशी विचारणा करण्यात आली. त्यानंतर आमदार राजू सेठ यांनी आपल्या निधीतून नाल्याचे काम करून दिले जाईल, असे सांगितले.
नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले, बसवेश्वर सर्कल खासबाग येथील नाला 50 वर्षांपूर्वीचा आहे. सदर नाला खुला असल्याने त्याठिकाणी सफाई कामगार नाल्यात उतरून सफाई करतात. जुन्या नाल्याचे दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे त्याच्यावर स्लॅब घालण्यात यावे, तातडीने अधिकाऱ्यांनी भेट देऊन नाल्याची पाहणी करावी, अशी मागणी केली. त्याचबरोबर नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारी वारंवार तुंबत आहेत. त्यामुळे गटारीवरील स्लॅब हटवून सफाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी देखील महात्मा फुले रोडवरील गटारींची सफाई करण्याची मागणी केली. गटारीवर घालण्यात आलेल्या स्लॅबमुळे नाल्यांची सफाई करणे कठीण जात आहे. त्यामुळे त्यावरील काँक्रिट हटविण्यात यावे, अशी मागणी केली. बहुतांश नगरसेवकांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि गटारींची सफाई करावी, अशी मागणी बैठकीत केली. नगरसेवक रवी धोत्रे यांनीदेखील नाले सफाईवरून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
नूतन सत्ताधारी गटनेते म्हणून अॅड. हणमंत कोंगाली यांची निवड
महापालिकेचे नूतन सत्ताधारी गटनेते म्हणून अखेर अॅड. हणमंत कोंगाली यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारच्या सर्वसाधारण बैठकीत मावळते गटनेते गिरीश धोंगडी यांनी सदर निवडीची घोषणा केली. त्यामुळे यापुढे मनपाचे सत्ताधारी गटनेते म्हणून अॅड. हणमंत कोंगाली भूमिका पार पाडणार आहेत. गेल्या वर्षभरापासून महापालिकेचे सत्ताधारी गटनेते म्हणून गिरीश धोंगडी धुरा सांभाळत होते. दरवर्षी नूतन गटनेत्याची निवड केली जाते. मात्र, यावेळी या प्रक्रियेला विलंब झाला. यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत गटनेत्याची निवड केली जाणार होती. मात्र, शनिवारच्या बैठकीत नूतन गटनेत्याची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल उपस्थितांनी नूतन गटनेत्याचे अभिनंदन केले.









