दक्षिण मतदारसंघातील विविध भागांना भेटी : आणखी दोन दिवस होणार सर्वेक्षण
बेळगाव : बेळगावच्या स्वच्छ सर्वेक्षणाला शनिवारी सुरुवात झाली असून सर्वेक्षणासाठी आलेल्या तीन सदस्यांच्या पथकाकडून पहिल्या दिवशी शहरातील प्रमुख रस्ते, उद्यान, सार्वजनिक शौचालय, तलाव आदींची पाहणी करण्यात आली. रविवारी रामतीर्थनगरसह विविध ठिकाणी घरोघरी भेटी देऊन नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. तसेच घंटागाडी कचरा वर्गीकरणाच्या मोहिमेची माहिती घेण्यात आली. शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी दाखल झालेल्या पथकाकडून रविवारी रामतीर्थनगर, आझमनगर, शाहूनगर, संगमेश्वरनगर, हनुमाननगर, शिवबसवनगर, सह्याद्रीनगर आदी ठिकाणी भेटी देऊन कचरा, रस्ते, गटारी, उद्यान, तलाव, कचराकुंड्या आदींची पाहणी केली. शहरात महापालिकेकडून कशा पद्धतीने कचऱ्याची उचल होते व त्याची योग्यरित्या विल्हेवाट केली जाते की नाही याबाबत देखील माहिती घेतली.
त्याचबरोबर घंटागाडी व कचरा वर्गीकरण मोहिमेची मनपा अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. घरोघरी भेटी देऊन नागरिकांची मते आजमावण्यात आली. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी स्वच्छ सर्वेक्षण पथकाकडून अनगोळ, मजगाव, उद्यमबाग, क्लब रोड, चन्नम्मा चौक, कचेरी रोड, कंग्राळ गल्ली, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, खंजर गल्ली याठिकाणी भेट देण्यात आली होती. त्याचबरोबर विविध हॉटेल्सना भेट देऊन तेथील कचरा संकलनाबाबत माहिती घेतली जात आहे. शहरातील नाल्यांचीही पाहणी करण्यात येत आहे. पथकातील अधिकाऱ्यांसोबत महापालिकेचे आरोग्य व पर्यावरण विभागाचे कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत. पथकामध्ये दोन पुरुष व एक महिलेचा समावेश असून आणखी दोन दिवस हे पथक बेळगावात वास्तव्य करून सर्वेक्षण करणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल या प्रथकाकडून केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.









