लोकायुक्त तपास अहवाल सोमवारी न्यायालयात सादर होणार
बेंगळूर : राज्य राजकारणात खळबळ माजविलेल्या म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) भूखंड वाटप प्रकरणाचा लोकायुक्त पोलिसांचा तपास बहुतेक पूर्ण झाला आहे. या तपासात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी बी. एम. पार्वती यांना क्लिनचीट मिळाल्याचे समजते. लोकायुक्त अधिकारी मुडा प्रकरणी आपला तपास अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करणार आहेत. मुडा प्रकरणाचा तपास बहुतेक पूर्ण झाला असून त्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांना क्लिनचीट देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. मुडाच्या गैरव्यवहारात मुख्यमंत्र्यांचा सहभाग कोठेही आढळून आलेला नाही. जमीन डीनोटीफाय करताना, भूपरिवर्तन करताना अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, असा उल्लेगा लोकायुक्त तपास अहवालात असल्याचे समजते. मुडाचे आयुक्त, महसूल अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आल्याने पुढे काय करावे याविषयी कायदेतज्ञांचा सल्ला घेण्यास राज्यसरकार सरसावल्याचे सूत्रांकडून समजते.
न्यायालयात अहवाल सादर करणार
मुडाच्या गैरव्यवहारासंबंधीचा तपास अहवाल लोकायुक्त अधिकारी सोमवारी न्यायालयात सादर करणार आहेत. लोकायुक्त अधिक्षक टी. जे. उदेश यांच्या नेतृत्वाखाली मुडाच्या भूखंड वाटपातील गैरव्यवहाराचा तपास करण्यात आला आहे. मुडाच्या कार्यालयाला बुधवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन तपासणी केली होती. टी. जे. उदेश यांनी मुडाच्या कार्यालयाला भेट देऊन 50:50 प्रमाणातील भूखंड वाटपाविषयी चर्चा करुन माहिती जमा केली. 11 नोव्हेंबर 2020 रोजी मुडाच्या बैठकीत झालेल्या चर्चेसंबंधिची ध्वनीफित मागवून त्यांनी माहिती जमा केली होती.
ईडीचा तपास प्रगतीपथावर
मुडाच्या गैरव्यवहारासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाकडूनही (ईडी) तपास सुरु आहे. दरम्यान मुडाचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी याचिका उच्च न्यायालयात असून त्यावरही सुनावणी केली जात आहे. 27 जानेवारी रोजी सीबीआय तपासासंबंधीच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच लोकायुक्त अधिकारी तपास अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याने प्रकणाविषयी कुतुहल आणखी वाढले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाशिवाय शक्यच नाही : स्नेहमयी कृष्ण
लोकायुक्त अहवालात मुख्यमंत्र्यांना क्लिनचीट देण्यात आल्याच्या वृत्ताविषयी प्रतिक्रिया देताना तक्रारदार स्नेहमयी कृष्ण म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रभावाशिवाय अधिकारी गैरव्यवहारात सामिल होणे शक्यच नाही. लोकायुक्त अहवालात मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला क्लिनचीट दिल्याविषयी अधिकृत माहिती मला मिळालेली नाही. तरीदेखील क्लिनचीट मिळणे साहजिकच आहे. तरीसुद्धा माझ्या आंदोलनाला कोणताही अडसर येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाशिवाय अधिकारी गैरव्यवहारात सहभागी होणे शक्यच नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रभावाचा वापर केला आहे, असेही स्नेहमयी कृष्ण यांनी म्हटले आहे.
मुडा प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मला आणि पत्नी पार्वती यांना क्लिनचीट दिल्याचे मला माहित नाही. अर्थसंकल्पाविषयी तयारी करावी लागत असल्याने मी दावोसच्या परिषदेत भाग घेतलेला नाही. मागिलवेळीही भेट दिली नव्हती.
– सिद्धरामय्या, मुख्यमंत्री









