ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र, आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे या प्रकरणात अजित पवारांना ईडीने क्लीन चिट दिली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, असे काहीही नसून, ईडी काही दिवसांत पुरवणी आरोपपत्र दाखल करून त्यामध्ये अजित पवारांचे नाव घेऊ शकते, असे ईडीमधील सूत्रांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
ईडीने राज्य सहकारी बँक घोटाळय़ाप्रकरणी 2021 मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जवळपास 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणाची अद्याप न्यायालयाने दखल घेतली नसून, पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपपत्र आणि अजित पवार यांच्याशी संबधित प्रश्नांवर उत्तर देण्याचे टाळले आहे.
मात्र, ईडीमधील सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना दिलासा मिळाला असं नाही. ईडी काही दिवसात पुरवणी आरोपपत्र दाखल करून त्यात अजित पवारांचे नाव घेऊ शकते.
अधिक वाचा : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट?








