चौथ्या वनडेत द.आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर 164 धावांनी दणदणीत विजय : पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 बरोबरी : आज उभय संघात रंगणार निर्णायक फायनल
वृत्तसंस्था /सेंच्युरियन (द.आफ्रिका)
आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला शुक्रवारी मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला.ऑस्ट्रेलिया संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. उभय संघात 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा 164 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाने 400 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही 24 वी वेळ आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्वाधिक 7 वेळा अशी कामगिरी करण्याचा विक्रम केला आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात हेन्रीच क्लासेनचे वादळी दीडशतक (83 चेंडूत 174), डेव्हिड मिलर (45 चेंडूत नाबाद 82) व ड्युसेन (62) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर द.आफ्रिकेने 50 षटकांत 5 बाद 416 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाचा डाव 34.5 षटकांत 252 धावांवर आटोपला. आफ्रिकेने हा सामना 164 धावांनी जिंकत या मालिकेत बरोबरी साधली. आज, जोहान्सबर्ग येथे उभय संघात पाचवा व अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रिक्स यांनी डावाला सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी झाली. रिझा हेंड्रिक्स 28 धावा करून बाद झाला पण डी कॉकने एक बाजू लावून धरली होती. त्याने 62 चेंडूत 45 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रॅसी व्हॅन डर ड्युसेननेही 65 चेंडूत 62 धावांचे योगदान दिले. तर कर्णधार अॅडम मॅरक्रम फलंदाजीत चमक काही दाखवू शकला नाही.
क्लासेनची क्लास खेळी, अवघ्या 57 चेंडूत झळकावले शतक
दरम्यान, क्लासेन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आला. क्लासेनने पहिल्या चेंडूवर स्फोटक सुरुवात केली आणि डावाच्या अखेरीस त्याचा शेवट झाला. यादरम्यान त्याने अवघ्या 57 चेंडूत आपले तिसरे शतक पूर्ण केले. क्लासेनने 83 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार व 13 षटकारासह 174 धावा ठोकल्या. या शतकी खेळीसह तो आफ्रिकेकडून वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही सामील झाला. वनडेत आफ्रिकेकडून सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम एबी डिविलियर्सच्या नावावर आहे. त्याने 31 चेंडूत शतक झळकावण्याचा कारनामा 2015 मध्ये केला होता. या यादीत क्लासेन चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. तसेच, यादीत डिविलियर्सचे नाव सर्वाधिक 7 वेळा आहे. याशिवाय डेव्हिड मिलरनेही 45 चेंडूत 82 धावा ठोकल्या. त्याने 5 षटकार आणि 6 चौकार मारले. मिलर आणि क्लासेनने पाचव्या विकेटसाठी 15 षटकात 222 धावांची विक्रमी भागिदारी केली. यामुळे आफ्रिकेला 5 बाद 416 धावांचा डोंगर उभा करता आला.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांची निराशा
आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 417 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 34.5 षटकांत 252 धावांवर आटोपला. ऑसी संघाकडून अॅलेक्स केरीने सर्वाधिक 77 चेंडूत 99 धावा केल्या. टीम डेव्हिडने 35 तर लाबुशेनने 20 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्याने ऑसी संघाला 164 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. द.आफ्रिकेकडून एन्गिडीने सर्वाधिक 4 बळी तर रबाडाने 3 बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 50 षटकांत 5 बाद 416 (ड्युसेन 62, क्लासेन 174, मिलर नाबाद 82, हॅजलवूड 2 तर स्टोनिस, निसर व एलिस प्रत्येकी एक बळी).
ऑस्ट्रेलिया 34.5 षटकांत सर्वबाद 252 (अॅलेक्स केरी 99, टीम डेव्हिड 35, लाबुशेन 20, मार्क स्टोनिस 18, एन्गिडी 51 धावांत 4 तर रबाडा 41 धावांत 3 बळी).
द.आफ्रिकेचा असाही विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात द.आफ्रिकेने 50 षटकांत 5 बाद 416 धावा केल्या. या सामन्यात आफ्रिकन संघाने वनडेच्या कोणत्याही सामन्यातील अखेरच्या 10 षटकात सर्वाधिक धावा करण्याचा महाविक्रम बनवला. यामुळे इंग्लंडचाही विक्रम मोडीत काढला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या सामन्यात आफ्रिकेने अखेरच्या 10 षटकात 173 धावांचा पाऊस पाडला. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही सामन्यात अखेरच्या 10 षटकात यापूर्वी एवढ्या धावा कधीच बनल्या नव्हत्या. यापूर्वी वनडे सामन्याच्या अखेरच्या 10 षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंड संघाच्या नावावर होता. इंग्लंडने 2022 मध्ये नेदरलँडविरुद्ध अखेरच्या 10 षटकात 164 धावा केल्या होत्या. मात्र, आता आफ्रिकेने इंग्लंडला मागे टाकले.
एका वनडे सामन्यात अखेरच्या 10 षटकात सर्वाधिक धावा करणारे संघ
- 173 धावा – दक्षिण आफ्रिका वि इंग्लंड, 2023
- 164 धावा – इंग्लंड वि नेदरलँड, 2022
- 163 धावा – द.आफ्रिका वि वेस्ट इंडिज, 2015
- 154 धावा – इंग्लंड वि वेस्ट इंडिज, 2009
- 153 धावा – न्यूझीलंड वि वेस्ट इंडिज, 2015









