कोल्हापूर विभागांतर्गत १ लाख १६ हजार १२८ विद्यार्थी परीक्षा देणार
विभागीय मंडळाकडून परीक्षेची तयारी पूर्ण
कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची लेखी परीक्षा उद्या(दि. ११) पासून सुरू होणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून बारावी परीक्षा १ लाख १६ हजार १२८ विद्यार्थी देणार आहेत. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या मदतीने परीक्षेचे कामकाज पूर्ण झाले आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व साहित्य परीक्षा केंद्रावर पोहचवले आहे. विद्यार्थीही अभ्यास करण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे.
महाराष्ट्र राज्य कोल्हापूर विभागीय मंडळाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. कोल्हापूर विभागात बारावीची १७६ केंद्रावर १ लाख १६ हजार १२८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बारावीची 23 परीक्षा केंद्र, सांगली जिल्ह्यातील ४ तर सातारा जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलले आहेत. तसेच परीक्षा घेणे, परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणीसाठी मॉडरेटर व विषय तज्ञांची नियुक्तीही करण्यात आली आहे. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागाने मोठा बंदोबस्त केला आहे. भरारी पथकांसह बैठी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. विद्यार्थ्यांना अडचण आल्यास केंद्राने दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा भयमुक्त द्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.








