तीन सदस्यीय समितीची स्थापना : जिल्हा पंचायत कार्यालयात होणार वेबकास्टिंग
बेळगाव : पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेला शनिवार दि. 1 पासून प्रारंभ होत आहे. पेपरफुटीच्या घटना घडू नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. शैक्षणिक जिल्ह्यात तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पेपरच्या दिवशी पहाटे प्रश्नपत्रिका पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये वेबकास्टिंग केले जाणार आहे.
1 ते 20 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 21,518 नवीन विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर खासगी, रिपिटर व रिझल्ट वाढविण्यासाठी काही विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. त्रिसदस्यीय समितीमध्ये स्पेशल जिल्हाधिकारी, ट्रेझरी अधिकारी व जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रश्नपत्रिका महाविद्यालयांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकरा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्या वाहनांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्या वाहनांना जीपीएस बसविले जाणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार सर्व अधिकाऱ्यांची तसेच पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर्षी पोलीस खात्यासोबतच आरोग्य खाते, ट्रेझरी खाते व पोस्ट विभागाचेही सहकार्य वेळेत प्रश्नपत्रिका पोहोचविण्यासाठी घेण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत बारावी परीक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी सूचना करण्यात आली. पेपरफुटीचे प्रकार घडणार नाहीत, त्याचबरोबर कॉपीला थारा मिळणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज जिल्हा पंचायत कार्यालयात तपासले जाणार आहे.
– एम. एम. कांबळे (पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)









