प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त :सीसीटीव्हीची नजर
प्रतिनिधी/ बेळगाव
बारावीच्या अंतिम परीक्षांना शनिवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 41 परीक्षा केंद्रांवर कन्नड विषयाचा पेपर पार पडला. पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती. बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी अन्य भाषा निवडल्याने या पेपरला तितकीशी गर्दी नव्हती.
सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत पेपर घेण्यात आला. तासभर आधीपासून विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते. एकूण 80 गुणांचा पेपर घेण्यात आला. सकाळी 6 वाजल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी नेमणूक केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून ट्रेझरी कार्यालयातून प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात आले. ट्रेझरी कार्यालयापासून परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका नेणाऱ्या वाहनांना जीपीएस लावण्यात आले होते.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबरोबरच फ्लाईंग स्क्वॉड व सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात येत आहे. बेळगावच्या जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव परिसरातील सर्व परीक्षा केंद्रांमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत होते. यासाठी तज्ञ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे.
शनिवारी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने परीक्षा केंद्रांवर तितकीशी गर्दी नव्हती. सोमवारी विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचा गणित, कला विभागाच्या विद्यार्थ्यांचा शिक्षण तर वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचा बिझनेस स्टडीज हा पेपर होणार आहे. त्यामुळे सोमवारी परीक्षा केंद्रांवर गर्दी होणार आहे.
पहिल्याच दिवशी 422 विद्यार्थी अनुपस्थित
कन्नड विषयाच्या पेपरला 422 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. कन्नड विषयासाठी एकूण विद्यार्थ्यांपैकी 13,574 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अनुत्तीर्ण राहणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे पदवीपूर्व शिक्षण विभागाच्यासमोर डोकेदुखी वाढली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षागृहापर्यंत आणण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभाग, तसेच शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत.









