सिंधुदुर्गनगरी :
दहावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली असून जिल्ह्यात 41 परीक्षा केंद्रांवर 9 हजार 7 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. प्रथम भाषा मराठीचा पहिलाच पेपर झाला असून कुठेही गैरप्रकार किंवा कॉपी झालेली नाही. दहावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. कुठेही गैरप्रकार झालेला नाही. तसेच 11 फेब्रुवारीपासून सुरू असलेली बारावीची परीक्षाही सुरळीत सुरू असल्याची माहिती कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू झाली. जिल्ह्यात 23 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू झाली. त्यानंतर 21 फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेच्या वेळी कुठेही कॉफीचा प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथके नेमली असून भरारी पथकांनी केलेल्या पाहणीत कुठेही गैरप्रकार किंवा कॉफी करण्याचा प्रकार घडलेला नाही.
इयत्ता बारावी व दहावीची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली बारावी व दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेरॅद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येत आहे.
कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, पहिलाच मराठीचा पेपर झाला, मात्र कुठेही गैरप्रकार झालेला आढळलेला नाही. यापुढच्या सर्व पेपरच्या वेळी सुद्धा कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.








