परीक्षेची सांगता : एकमेकांना रंग लावत केला जल्लोष
बेळगाव : मागील वर्षभरापासून दहावी परीक्षेसाठी मेहनत घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्व पेपर सुरळीत पार पडल्याने रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. त्यामुळे सर्वच परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांची धम्माल पहायला मिळाली. 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली. शुक्रवारी तृतीय भाषा पेपर होता. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत हा पेपर घेण्यात आला. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी परीक्षा केंद्रांबाहेर पालकांची गर्दी होती.
यावर्षी कोणताही गैरप्रकार न करता परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडली. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसोबतच शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. काहींनी फटाके फोडून तर काहींनी एकमेकांना रंग लावून परीक्षा संपल्याचा आनंद व्यक्त केला. परीक्षा केंद्रांबाहेर कॉम्प्युटर क्लासेस, व्हॅकेशन क्लासेस तसेच पीयुसी कॉलेजचे प्रतिनिधी आपल्या जाहिराती करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता सुटीच्या दिवसात कोणता तरी कोर्स करावा, तसेच पुढील अभ्यासक्रमाला योग्य होईल, असे तंत्रज्ञान शिकावे, अशी इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
558 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती
एसएसएलसी परीक्षेचा शेवटचा पेपर शुक्रवारी पार पडला. 32 हजार 989 विद्यार्थ्यांनी या पेपरसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 32 हजार 431 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. 558 विद्यार्थ्यांनी तृतीय भाषा पेपरला दांडी मारली. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीतपणे पार पडला.









