शाळेत जाताना रस्त्यावर कोसळली होती विद्यार्थिनी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे युवांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचदरम्यान तेलंगणात एक धक्कादायक घटना घडल आहे. केवळ 16 वर्षे असलेल्या श्री निधीचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला आहे. शाळेत जात असताना तिला हृदयविकाराचा धक्का बसला होता. यानंतर तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे तिला वाचविता आले नाही. रामरेड्डी तालुक्यातील सिंगारपल्ली गावची रहिवासी असलेली श्री निधी शालेय शिक्षणासाठी कामारेड्डी येथे राहत होती. श्री निधीला छातीत वेदना झाल्या आणि ती खाली कोसळली, शाळेनजीकच ही घटना घडली होती असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी तिला त्वरित रुग्णालयात हलविले, जेथे तिला मृत घोषित करण्यात आले. विद्यार्थिनीला सीपीआर देण्यात आला, परंतु कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तर श्री निधीच्या मृत्युमुळे शाळेत शोक पसरला आहे. श्री निधीचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचे कळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.









