महापौर, आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार ; विधानसभा अधिवेशनानंतर पुन्हा बैठक
पणजी : राजधानी पणजी शहरात स्मार्ट सीटीच्या नावाखाली करण्यात आलेल्या निम्न दर्जाच्या विकासकामांवरून नगरसेवकांनी महापौरांवर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरले. बुधवारी सकाळी पणजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मिरामार प्रभागाचे नगरसेवक जोएल आंद्राद यांच्यासह अन्य विरोधकांनी महापौर रोहित मोन्सेरेत आणि आयुक्त क्लेन मदेरा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. स्मार्ट सीटीच्या दर्जाहीन कामांमुळे पणजीत पूरस्थिती निर्माण होईल असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. पहिल्याच पावसात पणजीतील बहुतेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे तो खराही ठरला. मिरामार भागात तर ही परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे दिसून आले आहे.
रस्ते, गटारव्यवस्था कोलमडली
राजधानीत नुकतेच केलेले रस्ते खराब झाले आहेत. गटारव्यवस्था पूर्णत: खराब झाली आहे. त्यामुळेच पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरे तर यासाठी आधीच सल्लागार नियुक्त करणे आवश्यक होते, परंतु तसे करण्यात आले नाही. परिणामी कोणत्याही कामावर कुणाचेच नियंत्रण राहिले नसल्याने सर्व कामे पाण्यात गेली आहेत. मिरामार सर्कल ते बालभवन भागात स्मार्ट सिटीने हाती घेतलेल्या नवीन निचरा व्यवस्थेची स्थिती वाईट आहे. त्यासंबंधी नागरिकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देताना आम्हा नगरसेवकांना शरम वाटू लागली आहे, असे आंद्राद म्हणाले.
इमारतींच्या ‘स्ट्रक्चरल’ ऑडिटची गरज
कला अकादमीच्या कोसळलेल्या स्लॅबचे उदाहरण देताना आंद्राद यांनी शहरातील अनेक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली. या गंभीर प्रश्नी तातडीने लक्ष देऊन युद्धपातळीवर काम कऊया, असे त्यांनी सांगितले.
मिरामारचे काम लवकर पूर्ण होईल
आंद्राद यांना उत्तर देताना महापौर मोन्सेरात यांनी, ’आम्ही अद्याप सल्लागाराची नियुक्ती केली नसल्याचे सांगितले. तसेच मिरामार येथील नवीन निचरा व्यवस्थेच्या मूळ आराखड्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. ते काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आम्ही त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत, असे ते म्हणाले.
संयुक्त बैठक घेण्याची विनंती मान्य
नगरसेवक तथा माजी महापौर उदय मडकईकर यांनी बोलताना बहुतांश नगरसेवक चांगले काम करत असले तरीही आता स्मार्ट सीटी कामांवरून नागरिक नगरसेवकांना टार्गेट करू लागले आहेत, याकडे लक्ष वेधले. कंत्राटदार स्वत:च्या मर्जी आणि सवडीनुसार तसेच लोकप्रतिनिधींनासुद्धा विश्वासात न घेता कामे करत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी कामांच्या दर्जावरून अनेक विभागांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या मतास सर्व नगरसेवकांनी एका सुरात सहमती दर्शविली. त्यानंतर मडकईकर यांनी स्मार्ट सिटी, पीडब्ल्यूडी, जीएसयूडीए, मलनिस्सारण, वीज आणि जलस्रोत आदी खाते प्रमुखांची संयुक्त बैठक बोलावण्याची विनंती महापौर आणि आयुक्त यांना केली. दोघांनीही त्यास सहमती दर्शवताना विधानसभा अधिवेशनानंतर ही बैठक घेण्याचे सर्व नगरसेवकांनी ठरविले.









