घोटाळ्याच्या चौकशीची विरोधक, सत्ताधाऱ्यांची मागणी : आयुक्त धारेवर, मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचा इशारा
पणजी : मार्केट परिसरात विक्रेत्यांकडून होणाऱ्या सोपो वसुलीत उघडकीस आलेला महाघोटाळा आणि पे पार्किंग कंत्राटदारास बेकायदेशीररित्या मुदतवाढ, या मुद्द्यांवरून पणजी महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ माजला. त्यातील पे पार्किंग कंत्राटदारास मुदतवाढ देण्याच्या घोटाळ्यात थेट मनपा आयुक्तच गुंतले असल्याचा दावा करत त्याप्रकरणी आपण मुख्य सचिवांकडे तक्रार करणार आहे. तसेच दक्षता खात्यामार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचा इशारा माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी दिला. सोपो वसुलीच्या उघडकीस आलेल्या कथित घोटाळ्यामुळे लोक आज प्रत्येक नगरसेवकाकडे संशयी नजरेने पाहू लागले आहेत. त्यातून पालिकेसह नगरसेवकांचीही बदनामी झाली आहे. त्यामुळे अशा गंभीर विषयावर आपसात वाद-विवाद, भांडणे करण्यापेक्षा सदर घोटाळ्यास जबाबदार असलेल्यांनाही याच बैठकीत बोलावून पत्रकारांसमक्ष सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आलेले पाहण्यास मिळाले.
मार्केट निरीक्षक बेन्तो हे ही जबाबदार?
सोपो वसुलीत झालेल्या घोटाळ्याची वेळीच चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास मनपासाठी हा कायमस्वऊपी राहणारा काळा डाग ठरणार आहे. त्यात नगरसेवकांसह आयुक्तांकडेही लोक बोटे दाखवणार आहेत. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या प्रकारास मार्केट निरीक्षक बेन्तो हेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. विनापावती सोपो वसुलीचा सदर घोटाळा उदय मडकईकर यांनीच गत आठवड्यात उघडकीस आणला होता. मात्र त्यावेळी त्याची व्याप्ती महाघोटाळ्याएवढी प्रचंड असेल याचा अंदाज त्यांनाही आला नव्हता. नंतरच्या काळात अनेक व्यापाऱ्यांनी संपर्क साधून माहिती दिली तसेच काही जणांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जुन्या पावत्या त्यांच्या हवाली केल्या. त्यावरून या पावत्या देण्यातही प्रचंड घोटाळा असल्याचे मडकईकर यांच्या निदर्शनास आले. या सर्वांचे पडसाद कालच्या सभेत उमटले. या प्रकरणी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनीही त्यांना साथ दिली. त्यावर बोलताना आयुक्त क्लेन मदेरा यांनी यापुढे सोपोवसुली कामाचे आऊटसोर्सिंग करण्यात येईल, असे सांगितले. मात्र त्यातून समाधान न झालेल्या नगरसेवकांनी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सोपोवसुली बंद ठेवण्यात यावी, आऊटसोर्सिंगचे नंतर पाहू, अशी मागणी केली.
मडकईकर, आयुक्त यांच्यात खडाजंगी
राजधानीत पार्किंगसाठी फी गोळा करणाऱ्या कंत्राटदारास अतिरिक्त मुदतवाढ देण्याच्या विषयावरून मडकईकर आणि आयुक्त यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. संबंधित कंत्राटदारास मुदतवाढ देण्यासंबंधी आपण प्रस्ताव दिलाच नसतानाही निवेदनात आपले नाव गोवण्यात आल्यावरून संतप्त बनलेले मडकईकर यांनी आयुक्तांना धारेवर धरले. तसेच एवढ्यावरच न थांबता सदर प्रकारास स्वत: आयुक्तच जबाबदार असल्याचा आरोप करत त्या प्रकरणी मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय संपूर्ण प्रकरणाची दक्षता खात्यामार्फत चौकशीचीही मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.









