तिघे जण जखमी : इस्पितळात उपचार : युवकाला उंचावऊन फेकले
बेळगाव : होनगा औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत तिघेजण जखमी झाले असून रात्री उशिरापर्यंत काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मुत्यानट्टी येथील लक्ष्मण दड्डी (वय 55), हितेश गुज्जर (वय 35) यांच्यासह तिघे जण जखमी झाले असून जखमींवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. एका स्टील कारखान्यात व्यवहाराच्यावेळी झालेल्या वादावादीतून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. होनगा औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कारखान्यात देवाणघेवाणीसंबंधी चर्चा सुरू असताना अचानक वादावादीला सुरुवात झाली. वादावादीनंतर एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. लक्ष्मणसोबत गेलेल्या दिलीप नामक एका युवकाला उंचावरून खाली फेकण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर होनगा औद्योगिक वसाहत परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यासंबंधी काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









