निवडणुकीपूर्वी झालेल्या संघर्षाने भीती
► वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील कांकेर जिह्यातील कोयलीबेरा भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी तुंबळ संघर्ष झाला. या चकमकीत डीआरजी जवानांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून दोन मृतदेह, एक इन्सास रायफल आणि एक भरलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे. एसपी दिव्यांग पटेल यांनी चकमकीला दुजोरा दिला.
कांकेरच्या कोयलीबेरा भागातील चिलपारस गावात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी दिवसभर चकमक सुरू होती. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात पहाटेपासूनच शोधमोहीम तीव्र केली होती. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली. येथे निवडणुकीपूर्वी नक्षलवादी कारवायांमुळे नक्षलग्रस्त भागात शांततापूर्ण मतदानाबाबत निवडणूक आयोगासह सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. येथे 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागात 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. कांकेरमधील मतदारही 7 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.









