सीओडीमार्फत चौकशी करू, मात्र सभागृह चालवा : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भूमिका
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेकडून नगर प्रशासन संचालनालयाच्या नोटिसीला जे उत्तर पाठवून दिले आहे त्याबाबत राजकारण करणे योग्य नाही. त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर सीओडी चौकशी करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. मात्र, केवळ तारखेच्या चुकीच्या उल्लेखावरून अधिकाऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. हा काही मोठा भ्रष्टाचार नाही. त्यामुळे सभागृहात चौकशीचा ठराव करावा आणि तो सरकारकडे पाठवावा, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये सांगितले. त्याला विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. या प्रकरणावऊन सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
याचवेळी केवळ आयुक्तांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केलेल्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आयुक्तांचीच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. मात्र, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हवी तर सीओडी, सीआयडी कोणतीही चौकशी करा. मात्र, यासाठी सभागृहाचा वेळ वाया घालवू नका, असे सांगितले. दुपारच्या सत्रामध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी स्वत: सभागृहात दाखल झाले. त्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. सुरुवात होताच नगरसेवक जिरग्याळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. याबाबत सभागृहात ठराव करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
त्यानंतर आमदार राजू सेठ यांनी केवळ ठराव करून चालणार नाही. तर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. नगर प्रशासन संचालनालयाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर महापौरांचीही स्वाक्षरी आहे. नगरसेवक अजीम पटवेगार यांनीही जोरदार मागणी केली. त्यामुळे पुन्हा सभागृहात मोठा गोंधळ उडाला. महापौरांनी याबाबत आपले उत्तर सभागृहासमोर द्यावे, अशी मागणी केली. त्यावर सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत साऱ्यांनाच शांत राहण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार खडाजंगी झाली. सर्वांना चौकशीच हवी आहे ना तर सरकारच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. मात्र, सभागृहाचे कामकाज थांबवू नका, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
138 चा मुद्दा येताच सभा संपविली
एखाद्या अधिकाऱ्याला लक्ष्य बनविणे योग्य नाही. केवळ या तारखेबाबतच चौकशी नको तर 138 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरही सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी आमदार राजू सेठ, नगरसेवक अजीम पटवेगार यांनी केली. हा विषय काढताच सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी सभा संपविण्यासाठीच प्रयत्न केला. महापौरांनीही या विषयावर आता बोलायचे नाही, असे म्हणत सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे बराच गोंधळ उडाला.
लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम
सभागृहामध्ये सर्वच विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे. सकाळपासून केवळ एका तारखेवरून गोंधळ उडाला. मात्र, आम्ही एका प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी करताच सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आणि महापौरांनी काढता पाय घेतल्याचा आरोप विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केला. नगरसेवक रवी साळुंखे यांनी 138 कामगारांच्या नियुक्तीबाबत चर्चा करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी मात्र त्याला विरोध करत काढता पाय घेतला. यामुळे त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. एकप्रकारे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला.
महापौरांची स्वाक्षरी केलेली फाईल गायब
नगरसेवक अजीम पटवेगार यांनी बेंगळूरला पाठविलेल्या प्रस्तावावर महापौरांची देखील सही आहे. त्यामुळे सभागृहामध्ये त्यांनी यावर उत्तर द्यावे, अशी जोरदार मागणी केली. चौकशी ही झालीच पाहिजे. मात्र, महापौरांनीच याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली. त्यावर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी तुमच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती आहेत का? असा प्रश्न केला. त्यानंतर महापौरांनीच स्वाक्षरी केलेली माझ्याकडे झेरॉक्स प्रत आहे. त्यामुळे यावर महापौरांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. दरम्यान, धक्कादायक माहिती म्हणजे महापौरांनी स्वाक्षरी केलेली सत्यप्रतीची फाईलच गायब असल्याचे दिसून आले. एकूणच सभागृहामध्ये मोठा गोंधळ उडाला होता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार करण्याचा अधिकार नाही
आयुक्तांकडून तारखेचा उल्लेख करताना चूक झाली असेल. मात्र या चुकीबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाला त्यांच्याविरोधात तक्रार देणे हे कोणत्या कायद्यात आहे, या एकाच कारणामुळे आम्ही महापालिका बरखास्त करू शकतो, असे खणखणीत उत्तर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. आम्हाला सभागृह बरखास्त करायचे नाही तर सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजेत. अधिकाऱ्यांवर दडपशाही करणे हे चुकीचे आहे, असे म्हणत अधिकारी स्वत:चे ऐकले नाहीत की त्यांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला आहे आणि आताही होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी केंद्रीय आयोगाकडे तक्रार केली तर त्यावरून आम्ही सभागृह बरखास्त करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वच प्रकरणांची होणार चौकशी
महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विकासकामांमध्ये गैरप्रकार झाला आहे. अधिकाऱ्यांवर दबाव घालून आजपर्यंत कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
प्रादेशिक आयुक्तांकडेही तक्रार
प्रादेशिक आयुक्तांकडेही सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली आहे. त्याबाबतही आपण चौकशी करत आहे. तक्रार कोणालाही देऊ देत. मात्र केवळ तारखेच्या उल्लेखावरून तक्रार देणे कितपत योग्य आहे, हे देखील त्यांनी ठरवावे, असे देखील स्पष्ट केले.
या सभेला उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शंकर पाटील, सविता पाटील, वाणी जोशी, बाबाजान मतवाले यासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते.
उपायुक्तपदी उदयकुमार तळवार
उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी उदयकुमार तळवार यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही त्यांनी महापालिकेमध्ये पर्यावरण अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यानंतर आता पुन्हा त्यांची नियुक्ती झाली असून ते शनिवारच्या सभेमध्ये उपस्थित होते.









