अनंतनागमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी 18 सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशीही चकमक सुरूच होती. या भागात आतापर्यंतची ही सर्वात दीर्घकाळ चाललेली चकमक आहे. यापूर्वी 2020 मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 18 तास चकमक झाली होती. त्याचवेळी, जम्मू-काश्मीरमधील ही तिसरी सर्वात जास्त काळ चाललेली चकमक आहे. यापूर्वी, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिह्यात भाटी धार वन येथे 9 दिवस कारवाई चालली होती. 31 डिसेंबर 2008 रोजी सुरू झालेला संघर्ष 9 जानेवारी 2009 रोजी संपला होता.
2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक झाली. पूंछ जिह्यात, डेरा की गली आणि भिंबर गली दरम्यानच्या जंगलात 19 दिवस कारवाई करण्यात आली. सध्या अनंतनागमध्ये गडुल कोकरनागच्या जंगलात चकमक सुरू असून तिला 6 दिवस उलटून गेले आहेत. येथील जंगलभागातील गुहांमध्ये आणखी दोन दहशतवादी लपल्याचा लष्कराला संशय आहे. अत्याधुनिक ड्रोन हेरॉन मार्क-2 च्या सहाय्याने त्यांची ठिकाणे शोधली जात आहेत. अनंतनागमधील चकमकीच्या ठिकाणावर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जात आहे. कोकरनागच्या घनदाट जंगलात 12 ते 20 फूट खोल गुहांमध्ये दहशतवादी लपले आहेत. दहशतवाद्यांनी या गुहांना सिमेंट, प्लास्टिक आणि लाकडाने झाकल्याचे ड्रोन फुटेजमध्ये दिसून आले आहे.
अत्याधुनिक ड्रोन हेरॉन मार्क-2 चा वापर
16 सप्टेंबर रोजी कोणत्याही दहशतवादी कारवाईत प्रथमच लष्कराने कोकरनागमध्ये हल्ल्यासाठी आपले सर्वात प्रगत ड्रोन हेरॉन मार्क-2 वापरण्यास सुरुवात केली. ड्रोनने दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांच्यावर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात दहशतवाद्याचा मृत्यू झाला. याशिवाय सुरक्षा दलांनी कोकरनागमध्ये दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाणही उद्ध्वस्त केले. चकमकीदरम्यान मुसळधार पावसातही हेरॉन सक्रीयपणे काम करत होते. याशिवाय क्वाड कॉप्टर ड्रोनने दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यात मदत केली. हे ड्रोन एकाचवेळी पाच बाजूंनी गोळ्या आणि ग्रेनेड डागू शकते. तसेच त्याची मारक क्षमता 15 किलोमीटरपर्यंत आहे.
तीन दहशतवाद्यांना किश्तवाडमध्ये अटक
हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना सोमवारी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) अटक करण्यात आली. तौसिफ-उल-नबी, जहूर-उल-हसन आणि रियाझ अहमद अशी त्यांची नावे आहेत. तिघांचीही तुऊंगात रवानगी करण्यात आली असून त्यांची अधिक चौकशी केली जात आहे.









