गोळीबारानंतर चकमक, दिवसभर शोधमोहीम
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागनंतर रविवारी किश्तवाडमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. रविवारी सकाळी किश्तवाड जिह्यातील जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने आपला मोर्चा सदर भागात वळवला असता शोधमोहिमेदरम्यान दोन्ही बाजूंनी काही वेळ गोळीबार झाल्याने भीषण संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत या भागात गोळीबार आणि शोधमोहीम सुरू होती.
किश्तवाडमधील नौनट्टा, नागेनी पायस आणि आसपासच्या भागात लष्कर, निमलष्करी दल आणि पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांचा थांगपत्ता न लागल्याने या भागात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले असून दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू आहे.
किश्तवाडमध्ये संघर्ष सुरू होण्यापूर्वी शनिवारी अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा हुतात्मा झाले होते. तसेच 3 सैनिक आणि 2 नागरिक जखमी झाले होते. यातील एका नागरिकाचा रविवारी ऊग्णालयात मृत्यू झाला. अनंतनागमध्ये दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू होती.









