चाकू, कोयता, शस्त्रांचा वापर, चार जण जखमी : पाच संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी
म्हापसा ; मालमत्तेच्या वादातून बार्देश तालुक्यातील डिमेलोवाडा-काणका येथे झालेल्या मुस्लीम कुटुंबियात हाणामारीत एकाच कुटुंबातील सदस्य आपापसांत भिडले. पोलिसांनी याप्रकरणी एकूण पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केला. या हाणामारीसाठी कोयते, चाकू व इतर शस्त्राचा वापर करण्यात आला. रात्री उशिरा झालेल्या या हाणामारीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती कळताच काणका गावातील नागरिक घटनास्थळी धाऊन गेले. मात्र हाणामारीचे गांभीर्य पाहून सर्वांनी बघ्याची भूमिका घेणे पसंत केले.
बार्देशात बुधवारी दि. 7 रोजी रात्री एकाच कुटुंबातील दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सातजणांविऊद्ध गुन्हा नोंदवून एकूण पाचजणांना अटक केली व या सर्वांना एका दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. संशयित ताज मोहम्मद शेख (50), फैजल शैख (29), जहीद शेख (33), फैजान शेख (28), अमीन शेख (46) अशी अटक केलेल्यांची नावे असून हे सर्वजण डिमेलोवाडा-काणका येथील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री 11.12 वा.च्या सुमारास घडली. यावेळी डिमेलोवाडा येथे आपल्या घराबाहेरील रस्त्यावर पहिल्या गटातील संशयित ताज शेख, फैजल शेख, हिना शेख, नीता नाईक व त्यांचे सहकारी आणि दुसऱ्या गटातील जहीद शेख, फैजान शेख, अमीन शेख व त्यांचे सहकारी हातात शस्त्रे घेऊन जमले. यावेळी संशयितांनी सार्वजनिक रस्ता वापरून प्रवाशांना प्रतिबंधित केले. ज्यामुळे डिमेलोवाडो परिसरातील शांतता भंग झाली. तसेच तक्रारदार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना कायदेशीर कर्तव्ये पार पाडण्यापासून अटकाव केला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितांविऊद्ध भारतीय दंड संहितेच्या 160, 143, 147, 148, 341, 504, 323, 324, 427, 506(2), 336, 353 व 149 कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल युस्ताकियो फर्नांडिस हे तक्रारदार आहेत.
पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सीताकांत नायक अधिक तपास करीत आहेत. साहाय्यक उपनिरीक्षक रिकी फर्नांडिस यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांस शिवीगाळ करीत दंडुका, चाकू या शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढविला. यात दोन्ही गटातील सदस्यांना दुखापत झाली. त्याचप्रमाणे संबंधितांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देत वाहनांची तोडफोड केला. यामध्ये अॅक्टिव्हा स्कूटर व पल्सर मोटारसायकलचे पुढच्या व मागच्या दिव्यांची लोखंडी सळ्यांनी तोडफोड केली. तसेच वैयक्तिक वस्तू व निवासी परिसराची नासधूस केली.
काणकात अशा प्रकारची पहिलीच घटना!
दरम्यान, स्थानिक पंच सागर लिंगुडकर याबाबत माहिती देताना म्हणाले की, येथे हाणामारी झाल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीच माघार घेण्यास तयार नव्हते. मुस्लीम गटात हाणामारीची ही हाणामारीची घटना घडली. संबंधित संशयितांवर म्हापसा पोलिसांनी कारवाई करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या पाचही संशयित आरोपींना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता न्याधीशांनी या संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.









