कारागृहात कैद्यांकडून मोबाईलचा वापर सुरूच : हाणामारी प्रकरणामुळे जेएमएफसी न्यायाधीशांनी दिली भेट
बेळगाव : हिंडलगा कारागृह नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. महिन्याभरापूर्वीच दोघा कैद्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा कारागृहात दोन दिवसांपूर्वी मोबाईलवरून दोघा कैद्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली असून जखमी कैद्याला कारागृहातील रुग्णालयात उपचार देण्यात आले आहेत. वासुदेव नायक (वय 34) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. चोरीप्रकरणी आठ महिन्यांपूर्वी वासुदेव याला अटक करून कारागृहात पाठविण्यात आले आहे. हा राहत असलेल्या कोठडीमध्ये दुसऱ्या एका कैद्याकडून मोबाईल वापरण्यात येत होता. मोबाईल वापरासंदर्भात वासुदेवने विचारले असता त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कारागृहातील कर्मचाऱ्यांकडूनच आपल्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप वासुदेवची आई सुनंदा हिने केली आहे. जखमी मुलाला पाहण्यासाठी रायबाग तालुक्यातील खनदाळ येथून कुटुंबीय आले आहे. मारामारीची घटना समजताच येथील जेएमएफसी प्रथम न्यायालयाचे न्यायाधीश महादेव यांनी तातडीने कारागृहाला भेट दिली आहे. मारामारी झाल्याची घटना खरी आहे. मोबाईलवरून मारामारी झाली आहे. मारामारीच्या घटनेत जखमी झालेला कैदी शौचालयामध्ये जाऊन बोलत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कारागृहामध्ये असलेला कैदीही मोबाईलवर बोलत असल्याचे त्याने सांगितले आहे. याबाबत कारागृह अधीक्षक कृष्णकुमार यांच्याशी संपर्क साधला असता कारागृहामध्ये बाहेरून मोबाईल आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. याची चौकशी करण्यात आली असून मारबडव करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
तपासणीवेळी कैद्याची चांगलीच धुलाई
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी कारागृहाबाहेरील स्वच्छतागृहांची स्वच्छता करून कैदी आत जात असताना बादल्यांमधून मोबाईल घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले होते. कारागृहात जात असताना तपासणी दरम्यान सदर कैदी तपास अधिकाऱ्यांच्या हाती सापडला. त्यावेळी त्याची चांगलीच धुलाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छतागृहांमध्ये मोबाईल कोणी आणून ठेवले? याची चौकशी करण्यासाठी कैद्यांची झाडाझडती घेण्यात आली.









