मिरज :
म्हैसाळ रस्त्यावर प्रगती पॅलेस हॉलसमोर सिगारेट ओढल्याच्या कारणातून दोन गटात तुफान राडा झाला. लोखंडी रॉड व धारदार कटरने मारहाण करण्यात आल्याने दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
मुस्ताक मोमीन आणि हैदर शेख अशी जखमींची नांवे आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, हल्लेखोरांपैकी चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, म्हैसाळ रस्त्यावरील प्रगती पॅलससमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये तरुणांचा एक गट जेवण्यासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर हॉटेलबाहेर असलेल्या पानटपरीवर ते सिगारेट ओढण्यासाठी थांबले होते. यावेळी सिगारेटचा धुर आल्याने लगतच असलेल्या अन्य एका तरुणासोबत वाद झाला. वादाचे पर्यावसन मारामारीत झाली.
यावेळी दुसऱ्या एका गटातील तरुणाने आपल्या अन्य साथीदारांना बोलावून घेतले. यावेळी दोन गटात वादावादी होऊन पुन्हा राडा झाला. लोखंडी रॉड व धारदार कटरने मारहाणीचा प्रकार घडला. या मारहाणीत मुस्ताक मोमीन आणि हैदर शेख असे दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात करण्यात आले.
मिरज दाखल मारामारीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धांव घेतली. संशयीत हल्लेखोरांपैकी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. उपचार घेणाऱ्या जखमी तरुणांकडून जबाब घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, जखमीपैकी एका तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. याबाबत शहर पोलिस तपास करीत आहेत.








