हुड्डा अन् सुरजेवाला समर्थक परस्परांना भिडले
वृत्तसंस्था/ करनाल
हरियाणाच्या करनाल येथे काँग्रेसच्या बैठकीत राज्य निरीक्षकाच्या उपस्थितीत भूपेंद्र हुड्डा आणि रणदीप सुरजेवाला या दोन्ही नेत्यांचे समर्थक परस्परांना भिडले आहेत. या दोन्ही गटाच्या समर्थकांनी परस्परांना हाणामारी केली आहे. या घटनेनंतर हुड्डा गटाने बैठकीत भाग घेतला, तर सुरजेवाला गटाने बैठकस्थळाच्या बाहेर विरोधात घोषणाबाजी केली आहे.
हरियाणा काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा माजी प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला यांचे गट निर्माण झाले आहेत. यातील सुरजेवाला हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर राज्यात हुड्डा यांच्या गट तुलनेत प्रबळ मानला जातो. या दोन्ही गटांमधील चढाओढ आता पक्षाला मारक ठरू लागली आहे. संबंधित बैठकीची पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती असा दावा सुरजेवाला गटाने केला आहे. तसेच या गटाने हुड्डा यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याने तेथील वातावरण तापले.









