अनेक जण ठार झाल्याची शक्यता ः सीमेवरील संघर्ष चिघळण्याची चिन्हे
वृत्तसंस्था / तोरखम
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अफगाण तालिबान अन् पाकिस्तानी पोलीस दलादरम्यान चकमक झाली आहे. या चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक जण मारले गेले असले तरीही नेमका आकडा समोर आलेला नाही. अफगाणिस्तानातील पत्रकार अब्दुलहक ओमेरी यांनी या चकमकीसंबंधी माहिती दिली आहे. ही चकमक पाकिस्तानच्या तोरखममध्ये झाली आहे. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी झालेल्या गोळीबारात 7 पाकिस्तानी मारले गेले हेते. तर अफगाणिस्ताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
नोव्हेंबर महिन्यात सीमावर्ती भागात 8 दिवसांपर्यंत सातत्याने गोळीबार झाला होता. यामुळे दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झाले होते. पाकिस्तानने तेव्हा राजनयिक मार्गाने हा संघर्ष थांबविण्याचा प्रयत्न केला होता. अफगाण तालिबान पाकिस्तानच्या सीमेमध्ये दहशतवादी पाठवत असून ते देशात हल्ले घडवून आण असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमेला डूरंड लाइन म्हटले जाते. पाकिस्तान याला अंतिम सीमारेषा मानतो, तर पाकिस्तानचे खैबर पख्तूनख्वा हे राज्य अफगाणिस्तानचे असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. पाकिस्तान सैन्याने सीमेवर काटेरी कुंपण उभारले आहे.
15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली होती. त्याच्या 5 दिवसांनी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी तालिबानने आपण डूरंड लाइन मानत नसल्याचे म्हणत पाकिस्तानला खैबर पख्तूनख्वा प्रांत अफगाणिस्तानला परत करावा लागणार, असे म्हटले होते. पाकिस्तानने तालिबानच्या या वक्तव्याला विरोध करत सीमेवर सैन्य तैनात केले होते. त्यानंतर तालिबानने सीमेवरील पाकिस्तानी सीमाचौक्यांवर हल्ले केले होते. या भागात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून अनेक जण तालिबानच्या ताब्यात आहेत.









