सांगली :
‘गरिबांवर हातोडा कशाला चालवताय, बड्यांची अतिक्रमणे आधी काढा,’ असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा नियोजन बैठकीत महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांना धारेवर धरले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत वाद थांबवला.
महापालिका क्षेत्रात सध्या आक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे. आमदार पडळकरांनी तो मुद्दा उपस्थित केला. महापालिका क्षेत्रात अद्याप फेरीवाल्यांचा झोन निश्चित झालेला नाही. फेरीवाला धोरण ठरलेले नाही. त्यांनी कुठे व्यवसाय करावा, हे तुम्ही सांगत नाही, मग कारवाई का करता? फेरीवाले वाहतुकीला अडथळा ठरू नयेत, हे मान्य आहे. मात्र त्यांना जागा देण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का? पाऊस सुरू आहे. सण-उत्सवांचा काळ आहे. अशावेळी बुलडोझर लावून त्यांच्या गाड्या मोडता, हे शोभत नाही, अशा शब्दांत पडळकरांनी हलाबोल केला.
आयुक्त गांधी यांनी, ज्यांचे अतिक्रमण आहे, ते कायदेशीर मार्गाने काढत आहोत. हे करताना कुणी अडथळा आणला तर गाडा मोडल्यास आम्ही जबाबदार नाही,’ अशी भूमिका मांडली. याच मुद्यावर जोरदार खडाजंगी झाली.
आयुक्तांची दादागिरी सुरू आहे. ती कदापी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत पडळकरांनी हला चढवला. ‘आधी या गरिबांना जागा द्या, तेथे सोयी करून द्या, त्यानंतर कुणी अतिक्रमण केले तर कारवाई करा, तोवर कारवाई करणार असाल तर रस्त्यावर उतरावे लागेल,’ अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.
- पत्रकार बैठकीत कारवाईचं समर्थन
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच भांडणाचा विषय पत्रकार परिषदेत सांगितला. ‘पडळकर आणि आयुक्त गांधी यांच्यात केवळ मारामारी व्हायची बाकी होती,’ अशा शब्दांत त्यांनी या ‘बंद दाराआड’च्या गोंधळाचे वर्णन केले. ‘पडळकर अभ्यासू आहेत, पुरावे असल्याशिवाय बोलत नाहीत. मात्र त्यांनी आपली भूमिका संयमाने मांडायला हवी,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. काम करताना सर्वांचे समाधान होऊ शकत नाही, अतिक्रमण काढणे नागारिकांच्या हिताचे आहे ते करताना काही लोक दुखावणार असे सांगत एक प्रकारे आयुक्तांच्या कारवाईचे समर्थनच केले.








