चिपळूण :
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेने बुधवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेल्या बैठकीत प्राणीमित्र, नागरिकांत खडाजंगी झाली. यामुळे प्रचंड गदारोळ झाल्याने अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यामुळे निर्णयाशिवायच बैठक गुंडाळली गेली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यातच त्यांनी बालकांसह वयोवृद्ध नागरिक दादा खातू व एका वासरावर हल्ला केला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण असून अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेसह नागरिकांनी नगर परिषदेकडे केली आहे. त्यामुळे यावर नेमका काय उपाय करावा, याचा निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नागरिकांसह अनेक प्राणीप्रेमींनी हजेरी लावली. त्यामुळे बैठक वादळी होणार, हे निश्चित झाले होते.
- मुख्याधिकाऱ्यांचे सुरुवातीलाच आवाहन
बैठकीचे प्रास्ताविक करताना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी ही बैठक वादविवादाची स्पर्धा नाही. त्यामुळे प्रत्येकाने बोलताना संविधानिक भाषा वापरावी, असे आवाहन केले.
मुख्याधिकारी भोसले यांचे प्रास्ताविक होताच माजी नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी अशी बैठक पहिल्यांदाच होत आहे. नगर परिषदेच्या 150 वर्षांच्या इतिहासातील ही शोकांतिका असल्याचे नमूद करत आज कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे बैठक होतेय अशाच बैठका गाढवे, जनावरे यांच्या त्रासावरही होणार का, असा सवाल केला. यावर भोसले यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत बैठक घेणे शोकांतिका असेल तर यापुढे तुम्हांला विश्वासात घ्यायचे की नाही, असा प्रतिप्रश्न केला. यावर माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी अशा बैठका होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करत मोदी-भोसले शाब्दीक चकमकीवर पडदा टाकला.
- लियाकत शहा यांचे वक्तव्य ठरले वादग्रस्त
बैठकीच्या सुरुवातीलाच मोदी-भोसले यांच्यात शाब्दीक चकमक झाली असतानाच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी कुत्र्यांबाबत आपली भूमिका मांडताना कुत्र्यांची उत्पत्ती लांडग्यापासून असल्याचे वक्तव्य केले. यावर नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला. यामुळे वातावरण तापले. हा शब्द मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर शहा यांनी कुत्र्यांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
- अशी झाली खडाजंगी
बैठकीत बहुतांशी नागरिकांनी कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी नसबंदी, रेबीज लस याबरोबर अन्य उपाय करण्याची मागणी केली. यावर प्राणीप्रेमींनी आक्षेप घेतला. कायद्याने ज्या बाबी करता येतील त्या करा, मात्र त्यांचे स्वातंत्र्य कोणालाही हिरावून घेता येणार नाही, अशी भूमिका घेतली. यावरुन बराच गदारोळ झाला. नागरिकांनी कुत्र्यांबाबत आपली मते मांडली की, त्यावर अधिकाऱ्यांना बोलून देण्याऐवजी प्राणीमित्रच कायदेशीर उत्तरे देत होते. त्यामुळे वातावरण अधिक तापले. शेवटी एकमेकांच्या अंगावर जाण्याएवढी वेळ आली. त्यामुळे बैठक संपवण्याआधीच सर्व अधिकारी निघून गेले. त्यानंतर प्राणीमित्र व काही नागरिकांमध्ये शाब्दीक हल्ला सुरुच होता. शेवटी काही नागरिकांनी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येसह अन्य उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे आपण का भांडायचे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद मिटला.
- नागरिकांच्या या होत्या तक्रारी अन् मागण्या
बैठकीत नागरिकांनी शहरात कुत्र्यांची संख्या वाढल्याने ती कमी करण्यासाठी उपाय काढावा, कुत्र्यांचे हल्ले थांबवण्यासाठी उपाय करावे, कुत्री गाड्यांची पार्पिंग कव्हर, सीट फाडतात त्यावर उपाय सांगावेत, त्यांच्यासाठी उक्ताड येथील वाहनतळात श्वान शाळा काढावी, शहरात जागोजागी असणारी चायनिज सेंटर, चिकन सेंटर यांच्यावर निर्बंध आणावेत, कायद्यांमध्ये बदल करावेत आदी मागण्या व तक्रारी केल्या. यातील काही तक्रारींवर प्राणीमित्रांनी आक्षेप घेतला.
- प्राणीमित्रांनी सूचवले हे पर्याय
कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी वर्षातून दोनवेळा नसबंदी शस्त्रक्रिया करावी, लसीकरण वेळेत करावे, कुत्र्यांना खाद्य टाकण्यासाठी जागा निश्चित कराव्यात, कुत्र्यांचे बालकांवरील हल्ले थांबवण्यासाठी कुत्र्यांवर प्रेम करण्याची बालकांना शिकवण द्यावी, प्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी रात्री वाहने सावकाश चालवण्याचे फलक जागोजागी लावावेत, वाहनांवरील कव्हर, सीट फाडण्याचे प्रकार टाळण्यासाठी गेट करावेत, व्हिनेगरचा वापर करावा आदी पर्याय सूचवले. यातील काही पर्याय बैठकीत वादग्रस्त ठरले.
- प्रशासनाने असे केले स्पष्टीकरण
बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्याधिकारी भोसले यांनी गेल्या 3 वर्षात 1 हजार 479 कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया झाली असून रेबीज लसही देण्यात आली आहे. लवकरच 500 कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. मात्र कुत्र्यांचे स्थलांतर, हत्या करणे कायद्यात बसत नसून तसे कोणतेही कृत्य प्रशासन करणार नाही, असे सांगितले. तर पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त सोनावणे यांनी कुत्र्यांबाबत असलेल्या कायद्याचे वाचन करत नगर परिषद करीत असलेल्या उपाययोजना बरोबर असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, वनपाल एस. एस. सावंत, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश काणे, सुधीर शिंदे, लियाकत शहा, मिलिंद कापडी, उमेश सकपाळ, करामत मिठागिरी, शशिकांत मोदी, विजय चितळे, आशिष खातू, महमद फकीर, रतन पवार, अदिती देशपांडे, स्वाती दांडेकर, सारिका भावे, राकेश दाते, अंकुश आवले, दादा खातू, शितल रानडे, भाऊ काटदरे, सिद्धेश लाड, संजय रेडीज, प्राजक्ता टकले, प्रियंका कारेकर, अर्चना कारेकर, योगेश बांडागळे, भैया कदम, निहार कोवळे, मल्लेश लकेश्री, प्राणीमित्र पूर्वा पेडणेकर, सिग्धा पुहान, पूजा पवार, साक्षी वाडे, समीक्षा वाडे, आकांक्षा चोरगे, हर्षद पवार, मीनल आंब्रे, गीता दाभोळकर, मृणाल जाधव, कुलदीप जडेजा, सौरभ पोतदार, गुजन वरवाटकर, अनिल शिंदे, सोहम पिंपळे, आसावरी विचारे, शैलेजा लांडे, महेंद्र दिघे आदी उपस्थित होते.








