ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन कैदी जखमी झाले आहेत. हरीराम गणेश पांचाळ आणि मुसा अबू शेख अशी जखमी कैद्यांची नावे असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी कैदी रोहन रामोजी शिंदे, साहील लक्ष्मण म्हेत्रे, अर्जुन बाजीराव वाघमोडे, ऋषिकेश हनुमंत गडकर, ओंकार नारायण गाडेकर, मंगेश शकील सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह शिपाई एकनाथ गांधले यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर आणि इतरांना मागील वर्षी आळंदीत झालेल्या भांडणात अटक करण्यात आली होती. त्यांना कारागृहातील बरॅक क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले होते. याच बरॅकमध्ये इतर कैदीही होते. 31 मार्च रोजी सकाळी पावणेदहा वाजता बॅरक क्रमांक 2 च्या जवळील हौदाजवळ त्यांची हरीराम पांचाळ आणि मुसा अबू शेख यांच्याशी या आरोपीची भांडणं झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन अर्जुन वाघमोडे आणि इतरांनी तेथील प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याच्या वगराळ्यांच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. यात पांचाळ आणि शेख जखमी झाले आहेत.









