आवश्यकता ही शोधांची जननी असते, अशी एक म्हण आहे. तिचा अर्थ असा की माणसाला जेव्हा तीव्रपणे एखादी आवश्यकता भासू लागते, तेव्हा माणूस ती भागविण्यासाठी एखादी वस्तू निर्माण करतो किंवा काहीतरी उपाय शोधून काढतो. सांप्रतच्या काळात सर्वाधिक समस्या कचऱ्याची आहे. घरगुती कचरा, कार्यालयीन कचरा, वैद्यकीय कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, रासायनिक कचरा असे विविध प्रकारचे कचरे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून त्यांचा निचरा करणे हे आव्हान आहे.
या स्थितीतून एक अद्भूत शोध जन्माला आला आहे. आपल्याभोवती कचरा तर पुष्कळ असतो. पण तो उचलून टाकण्याइतके बळ किंवा इच्छाशक्ती आपल्यापाशी असत नाही, इतके आपण कामाने थकलेलो असतो. अशावेळी अपोआप तो कचरा त्याच्या पेटीत गेला तर किती बरे होईल असे आपल्याला वाटते. हा नवा शोध आपली हीच समस्या दूर करणारा आहे. तो सत्यम नामदेव नामक विद्यार्थ्याने लावला असून त्याच्या प्रारुपाचे प्रदर्शन मध्यप्रदेशातील सागर येथील ‘एक्सलन्स स्कूल’ नामक प्रशालेतल्या विज्ञान उत्सवात करण्यात आले. सत्यम नामदेव याने एक सेन्सरयुक्त कचरापेटी (डस्टबिन) निर्माण केला आहे. या कचरापेटीचे वैशिष्ट्या असे की तिच्यात आपल्याला कचरा नेऊन टाकावा लागत नाही. तर ही कचरापेटीच कचऱ्याकडे येते. आपण टाळी वाजवून तिला आपल्या बसलेल्या जागी बोलावून घ्यायचे आणि तिच्यात कचरा टाकायचा. ज्या दिशेने टाळीचा ध्वनी येईल, त्या दिशेने ही कचरा पेटी चालू लागते. ती आपल्या जवळ पोहचली, की आपण तिचे झाकण उघडून तिच्यात आपल्या जवळचा कचरा टाकू शकतो, असे नामदेव यांचे म्हणणे आहे. या वस्तूचा लाभ असा की, आपल्याला कचरा टाकण्यासाठी जागचे उठावे लागत नाही. त्यामुळे कचरा टाकण्याचा कंटाळा करण्याचेही कारण नाही. ही पेटीच टाळीयुक्त आज्ञेनुसार आपल्याकडे येते.









