महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांची माहिती
मडगाव : कुळ-मुंडकार प्रकरणे निकालात काढण्याच्या कामाने आता गती घेतली आहे. पूर्वी प्रमाणे खटले मामलेदार कार्यालयात रेंगाळणार नसल्याची माहिती महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिली. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात काल सोमवारी झालेल्या दक्षिण गोव्यातील पहिल्या जनता दरबारात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पहिल्या जनता दरबारात लोकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. जनता दरबारात सार्वजनिक समस्यांऐवजी लोकांनी अधिक तर आपल्या वैयक्तिक समस्या मांडल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले. जनता दरबाराच्या माध्यमांतून जनतेच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल खात्याशी निगडीत समस्या वेळीच सोडविण्याचे आदेशही त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले. या पहिल्या जनता दरबाराला मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, वेळळीचे आमदार व्रुझ सिल्वा तसेच दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व मामलेदार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. जनता दरबारात लोकांनी वैयक्तिक समस्या जास्त प्रमाणात मांडल्या. या समस्या सोडविण्यात येईल असे मंत्री मोन्सेरात म्हणाले. महसूल खात्याशी निगडीत अधिकाऱ्यांनी लोकांशी चांगले संबंध ठेवावे, त्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्यास भाग पाडू नये तसेच एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात धावपळ करण्यास लावू नये असे मंत्री मोन्सेरात यांनी सूचित केले.
मामलेदारांना कायद्याची माहिती नसल्याने अडचण
पूर्वी मामलेदार कार्यालयात कुळ-मुंडकार खटले प्रलंबित रहाचे पण, आता हे खटले लवकर हातावेगळे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी या खटल्यांचा आढावा घेत आहेत. मामलेदारांची कमतरता आहे. ती भरून काढली जाईल. कुळ-मुंडकार प्रकरणात बऱ्याच मामलेदारांना त्या कायद्याची माहिती नसल्याने समस्या निर्माण होतात, त्यासंदर्भात सर्व मामलेदारांबरोबर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करण्यासाठी आता तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विंडो योजना सुरू करण्यात आलेली आहे. सोसायटीची नोंदणी केली जात नसल्याने सरकारच्या महसुलावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात झाडे कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे बरीच हानी होते. झाडे कापण्याची जबाबदारी ही आपत्कालीन व्यवस्थेची असून त्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे. खासगी जागेत झाडे असल्यास ती कापण्यास अडथळे आणले जातात. अशा वेळी लोकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.









