काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील महाविकास आघाडीत पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवऊन दावेदारी सुरू झाली असून दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील धुसफुसही चव्हाट्यावर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी तर थेट शिंदे गटातील 22 आमदार आणि 13 पैकी 9 खासदार संपर्कात असून मंत्री शंभुराजे देसाई यांनी उध्दव ठाकरे यांना फोन केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातच भाजपच्या माजी नगरसेविकेने काळ्या यादीतील ठेकेदाराला कोट्यावधीची कामे दिल्याचा आरोप करताना या ठेकेदाराच्या कामाची तपासणी कऊन अहवाल जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे.
2019 पासून महाराष्ट्रातील राजकारण हे सतत अस्थैर्याच्या दिशेने चालले असून विद्यमान सरकारचे भवितव्य कधी न्यायालयाच्या निकालावर तर कधी विधानसभा अध्यक्षाच्या निकालावर अवलंबून असल्याने सरकारच्या स्थैर्याबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आलेल्याला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होईल मात्र अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार नाही, सतत तारखांवर तारखा सांगितल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गट आणि भाजपातील धुसफुस चव्हाट्यावर आली असून भाजपकडून शिंदे गटाच्या 13 खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.न•ा हे कर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर भाजपचे नेते कामाला लागले असून भाजपने राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात संयोजकांची नियुक्ती कऊन तेथे भाजपची ताकद वाढविण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या 13 खासदारांच्या मतदार संघातही वजनदार नेते नेमण्यात आल्याने शिंदे गटातील खासदार आणि आमदार सध्या अस्वस्थ असून आम्हाला विश्वासात न घेता भाजपने असे करणे योग्य नसल्याचे शिंदे गटाकडून सांगताना आम्ही भाजपच्या चिन्हावर कदापि निवडणूक लढवणार नसल्याचे शिंदे गटातील खासदारांचे म्हणणे आहे तर शिवसेनेने अधिकच्या जागा मागू नयेत त्यांची बार्गेनिंग
पॉवर कमी करण्यासाठी भाजपकडून हा एकप्रकारे दबावतंत्राचाच वापर असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी तर थेट शिंदे गटातील 22 आमदार आणि 13 पैकी 9 खासदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगताना मंत्री शंभुराज देसाई यांनी आमची इकडे गळचेपी होत असल्याचे थेट उध्दव ठाकरेंना फोन केल्याचा दावाच विनायक राऊत यांनी केला आहे. हा दावा जर खरा असेल तर काही दिवसापूर्वी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी भविष्यात महाविकास आघाडीत मतभेद होऊन ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येऊन भाजपसोबत जातील असा दावा केला आहे, तर ठाकरे गटाचे दुसरे खासदार संजय राऊत यांनी ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी केवळ पैशासाठी बेईमानी केली त्यांना परत पक्षात प्रवेश देणार नाही. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्यात रोष आहे. त्यामुळे या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मेसेज करतात, भेटतात. वेदना बोलून दाखवतात. पण तरीही त्यांना प्रवेश देणार नाही, असे राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे दावे-प्रतिदावे बघता भविष्यात नेमक्या कोणाला किती जागा मिळणार कोण कोणाबरोबर राहणार महाविकास आघाडी आणि युती टिकणार का याबाबत सध्या तरी सांगणे कठीण आहे.
महाविकास आघाडीतही धुसफुस
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या एकहाती सत्तेंनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून, काँग्रेसकडूनही आता स्वबळाची भाषा बोलली जात आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवऊन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलाच सामना रंगण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची जागा ही काँग्रेसच लढणार असल्याचे काँग्रेस नेते सांगत असताना आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या लोकसभा मतदार संघात कोणत्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेली मते तसेच राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त असल्याचे सांगत या मतदार संघावर दावा केला आहे, तर काँग्रेस नेतेही या जागेवर दावा करत असल्याने या जागेवऊन दोन पक्षात चांगलेच व्दंद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाड येथील काँग्रेस नेते स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी थेट उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. 2019 ची विधानसभा निवडणूक माणिकराव जगताप यांनी काँग्रेसकडून शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्याविरोधात लढवली होती. त्यामुळे, शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर स्थानिक राजकीय समीकरण बदलत आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात चांगले अंडरस्टँडींग असल्याने पुणे लोकसभा पोटनिवडणूक वादात खासदार संजय राऊत यांनी कसेल त्याची जमीन असे वक्तव्य केले आहे. दापोली विधानसभा मतदार संघातून 2019ला विद्यमान शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी काही दिवसापूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता, मात्र या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादीतील अजित पवार वगळता कोणीही या पक्षप्रवेशावर बोलले नव्हते. त्यामुळे आगामी निवडणूका बघता स्थानिक समीकरणावर मोठ्या प्रमाणात भविष्यात पक्षप्रवेश होणार यात शंका नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष वाढीच्या अनुषंगाने दर महिन्यात एका मोठ्या नेत्याचे भाजपात प्रवेश होणार असल्याचा कार्यक्रम जाहिर केला होता मात्र आता भाजपातील पक्षप्रवेशही थांबले की थांबवण्यात आले माहीत नाही पण आगामी मुंबई महापालिका व लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मायक्रोप्लॅनिंगसह लोकसभा व विधानसभा मतदार संघनिहाय जोरदार तयारी सुरू केली आहे.
प्रवीण काळे