भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे ट्रम्प यांचे मत : भारताचेही स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन, नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत एक मोठा दावा केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारताने हात झटकले असून देशाच्या हितार्थ ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तथापि, याबाबत मॉस्कोवर दबाव वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमधील एक मोठे पाऊल असल्याचे वर्णन केले. युक्रेन युद्धामुळे रशियाला वेगळे करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे असे ट्रम्प म्हणाले.
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल मी खूश नव्हतो, परंतु आज त्यांनी (पंतप्रधान मोदींनी) मला आश्वासन दिले की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. आता आपल्याला चीनलाही असेच करावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लादला आहे. यापूर्वी, त्यांनी 25 टक्के परस्पर कर लादला होता. यामुळे भारतावरील एकूण कर 50 टक्के वर पोहोचला आहे.
राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधानांवर पाच आरोप केले आहेत. त्यांनी ‘एक्स’वर ‘पंतप्रधान मोदी अमेरिकेला घाबरले आहेत’ असे ट्विट केले. तसेच ते ट्रम्प यांना निर्णय घेऊ देतात आणि भारत रशियन तेल खरेदी करणार नाही अशी घोषणा करू देतात. वारंवार दुर्लक्ष केले जात असूनही ते ट्रम्प यांना अभिनंदन संदेश पाठवत राहतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अमेरिका दौरा रद्द करण्यात आला. ते स्वत: इजिप्तमधील शर्म अल-शेख शिखर परिषदेत सहभागी झाले नव्हते. ऑपरेशन सिंदूरवरील ट्रम्पच्या विधानांना ते विरोध करत नाहीत, असे मुद्देही राहुल गांधी यांनी उपस्थित करत पंतप्रधानांना लक्ष्य केले.
सार्वजनिक हिताचे निर्णय घेणार : परराष्ट्र मंत्रालय
ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत तेल आणि वायूचा एक प्रमुख खरेदीदार आहे. सार्वजनिक हितांचे रक्षण करणे हे आमचे प्राधान्य राहिले आहे. आमच्या आयात धोरणांचे हे उद्दिष्ट आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ट्रम्प आणि मोदी यांच्यात नजिकच्या काळात कोणतेही संभाषण झाले नसल्याचेही जयस्वाल यांनी जाहीर केले. जयस्वाल यांच्या या स्पष्टीकरणामुळे ट्रम्प यांच्या दाव्याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
तेल पुरवठा भारतासाठी फायदेशीर : रशिया
भारताबाबत ट्रम्प यांच्या दाव्याला भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी उत्तर दिले. भारताला रशियन तेल पुरवठ्याबाबत सतत सहकार्य सुरू आहे. मला विश्वास आहे की आम्ही या क्षेत्रात भारतासोबत सहकार्यावर चर्चा करत राहू, असे ते पुढे म्हणाले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांबद्दल आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. हा भारत आणि अमेरिकेतील विषय आहे. भारताचा आमच्याशी द्विपक्षीय संबंध आहे. रशियाचा तेल पुरवठा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि भारतीय जनतेसाठी खूप फायदेशीर आहे, असेही डेनिस अलिपोव्ह यांनी स्पष्ट केले.









