साडवली सह्याद्रीनगर येथील घटना, 1 लाख 75 हजार रूपयांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/देवरुख
पोलीस इन्स्पेक्टर आहोत असे सांगून वृध्द महिलेकडील दोन सोन्याच्या पाटल्या व दोन सोन्याच्या बांगड्या असा एकूण 1 लाख 75 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना साडवली सह्याद्रीनगर येथे शनिवारी घडली आहे. भर दिवसा घडलेली ही घटना घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत धीरज देसाई यांनी देवरूख पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. धीरज देसाई यांची आई कल्पना अनंत दसाई या शनिवारी सकाळी 10.15 च्या सुमारास देवरूख संगमेश्वर या मुख्य रस्त्यावरून ये- जा करत होत्या. याचवेळी एका इसमाने त्यांना आपण पोलीस इन्स्पेक्टर आहोत असे सांगितले. आत्ताच चोरी झाली असून तुम्ही सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरू नका असे सांगितले. हातातल्या बांगड्या व पाटल्या काढून कागदात ठेवण्यास सांगितले. याचवेळी या इसमाने हातचलाकी करत सोन्याच्या बांगड्या आपल्या ताब्यात घेत नकली बांगड्या कल्पना देसाई यांच्याकडे सुपुर्द केल्या. गळ्यातील सोन्याची चैन देखील हा इसम मागत होता.
हे ही वाचा : ग्रामस्थांच्या सतर्कतेने मुले पळवण्याचा प्रयत्न फसला
कल्पना देसाई या घरी गेल्यानंतर कागदामध्ये नकली बांगड्या असल्याचे दिसून आले. या इसमाने बंद दुकानाचा फायदा घेत चोरी केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या इसमाला दुचाकीवरील दोन जणांनी सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.