ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहे, याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या बैठका होत असून, त्यामध्ये हा आकडा स्पष्ट होईल. तत्पुर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी अजित पवारांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे.
अजित पवार यांच्या गटाची देवगिरी या निवासस्थानी बैठक होत आहे. शरद पवार गटाची बैठक दुपारी 1 वाजता वाय बी सेंटरला बैठक होणार आहे. दोन्ही गटाने आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून आमदार कात्रीत सापडले आहेत. यासंदर्भात बोलताना अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील म्हणाले, अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. आमदारांची प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. पण सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही, त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही.
दरम्यान, दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात येत आहे. निवडणूक आयोगात दोन्ही गटांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अजित पवार पक्ष आणि चिन्हावर दावा करु शकतात.








