ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खासदार संजय राऊत यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलंच भोवलं आहे. राऊत यांनी याप्रकरणी मुलुंड न्यायालयात नारायण राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
भांडूप येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणे यांनी राऊतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी राऊत यांनी राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती. राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचा दावा सिद्ध करावा, असे या नोटीसीमध्ये म्हटले होते. मात्र, राणे यांनी या नोटीसीला उत्तर देणे टाळले. अखेर राऊत यांनी राणे यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
काय म्हणाले होते राणे?
मी शिवसेनेत असताना 2004 साली संजय राऊत यांना राज्यसभेवर निवडून आणण्यासाठी मी खर्च केला होता. राऊत यांचे त्यावेळी मतदार यादीत नावही नव्हते. राणे यांच्या या वक्तव्यावरुन वातावरण पेटले होते. राऊतांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीला उत्तर न दिल्याने अखेर राऊत यांनी राणेंविरोधात मानहानीचा दावा दाखल केला.








