ग्रा. पं. चे दुर्लक्ष, अनियमित पाणीपुरवठा : रस्त्याचे काम दोन वर्षापासून अर्धवट : उपोषण करण्याचा इशारा
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे जांबोटी-रामापूर पेठ येथे नागरी सुविधांचा पार बोजवारा उडाल्यामुळे ऐन पावसाळ्dयात नागरिकांचे हाल होत आहेत. येथील नागरिकांना पाणी, रस्ते तसेच गटारीची गंभीर समस्या भेडसावत असून, सदर गैरसोय त्वरित दूर करावी. अन्यथा उपोषणाचा इशारा समाजसेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अनियमित पाणीपुरवठा
जांबोटी-रामापूर पेठ गावची लोकसंख्या सुमारे 3000 च्या घरात आहे. या गावासाठी राईच्या डोंगरातील नैसर्गिक जलस्त्राsत तसेच जलजीवन योजनेअंतर्गत मलप्रभा नदीतून नळपाणीपुरवठा अशा दोन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र ग्राम पंचायतीच्या अयोग्य नियोजनामुळे नागरिकांच्या दृष्टीने दोन्ही योजना कुचकामी ठरल्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यापासून या गावातील नळ पाणीपुरवठा अनियमित असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. विद्युत मोटारीत बिघाड, अनियमित वीजपुरवठा, जलवाहिन्या फुटणे, कमी दाबाचा पाणीपुरवठा आदी कारणांमुळे गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठ्यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक समस्या दूर करून नळ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वारंवार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्याचे काम अर्धवट
जांबोटी बसस्थानकापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे गेल्या दोन वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामापूर पेठ गावच्या प्रवेशद्वारावरील केवळ 30 मीटर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट असल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या 30 मीटर रस्त्यापैकी एका बाजूच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. गावच्या मुख्य रस्त्याचे प्रवेशद्वारावरीलच काँक्रिटीकरणांचे काम अर्धवट असल्यामुळे तसेच हा रस्ता उतरणीचा असल्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून अर्धवट रस्ताकामामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
गटारींची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष
रामापूर पेठ गावातील गटारींची गेल्या दोन वर्षापासून स्वच्छता करण्याकडे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. तसेच गटारीमधील गाळ व कचरा काढून त्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने गटारीद्वारे सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नाही. तसेच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे गंभीर समस्या उद्भवत आहेत. गावातील गटारींची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी आहे. रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविणे तसेच विजयनगर-गवळीवाडा गायरान जमिनीतील अतिक्रमण हटविणे, मालमत्ता सर्वेक्षण संदर्भात देखील ग्राम पंचायतकडून मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपोषणाचा इशारा
या संदर्भात जांबोटी समाजसेवा संघामार्फत माहिती हक्क अधिकारांतर्गत योग्य माहिती देण्यासाठी ग्राम पंचायतीला लेखी निवेदन देण्यात आले आहे. तरी जांबोटी ग्राम पंचायतने यासंदर्भात त्वरित कार्यवाही करून पाणी, रस्ते, गटारी साफसफाई आदी कामे पूर्ण करावीत, अन्यथा जांबोटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जांबोटी समाज सेवक संघाचे अध्यक्ष अरुण महाराज कणगुटकर तसेच पदाधिकारी निकी दालमेत, राजन कुडतुरकर, महादेव तळवार यांनी दिला आहे.









