लाखाची लाच स्वीकारताना केली कारवाई
बेळगाव : पिण्याच्या पाणी योजनेसाठी भूसंपादनाच्या बदल्यात भरपाईचा चेक देण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना शहर पाणीपुरवठा व भुयारी गटार मंडळाचे कार्यकारी अभियंत्याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. सोमवारी विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. रायबाग तालुक्यातील खेमलापूर येथील यासीन पेंढारी यांच्या मालकीची 14 गुंठे जमीन मुगळखोड व हारुगेरी येथे अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी भूसंपादित करण्यात आली होती. यासाठी सरकारकडून 18 लाख रुपये भरपाईची रक्कम मंजूर झाली होती. त्याचा चेक देण्यासाठी कार्यकारी अभियंते अशोक शिरुर यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती.
यासंबंधी यासीन पेंढारी यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. एफआयआर दाखल करून घेऊन पोलीस अधीक्षक हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी विश्वेश्वरय्यानगर येथील शहर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात लाच स्वीकारताना अभियंत्याला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईसाठी लोकायुक्त पोलीस निरीक्षक गोविंदगौडा पाटील, रवी मावरकर, गिरीश, शशीधर, सुरेश व मल्लिकार्जुन थईकार आदींची मदत मिळाली. लोकायुक्त पोलीसप्रमुखांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. शहर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लाच स्वीकारताना अटक झाल्याने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.









