फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने मोठ्या प्रमाणात अडथळा : बाजारपेठेतील रहदारीचा उडाला बोजवारा
बेळगाव : शहरातील रहदारी नियंत्रण करणारे रहदारी पोलीस विशेषत: हेल्मेट सक्तीवरच भर देत आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांचे पार्किंग आणि भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने ये-जा करण्यासाठी रस्ता मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील रहदारीचा बोजवारा उडाला असून सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने विविध रस्त्यांचे रुंदीकरण करून विकास करण्यात आला आहे. रुंदीकरणासाठी नागरिकांची घरे, व्यावसायिक आस्थापने हटविली. पण या रस्त्याचा वापर रहदारीऐवजी वाहने पार्क करण्यासाठी केला जात आहे. रामलिंग खिंड गल्लीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने दुचाकी व चार चाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने रस्त्यांचे रुंदीकरण नेमके कोणत्या कारणासाठी केले आहे, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. समादेवी गल्ली हे शहराचे प्रवेशद्वार असून राजेंद्र प्रसाद चौकातून प्रवेश केल्यास थेट मध्यवर्ती बसस्थानकाला जाता येते. पण या रस्त्यावर एका बाजूला पार्किंग तर दुसऱ्या बाजूला विक्रेत्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे राजेंद्र प्रसाद चौकातून मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत जाताना अनेक अडथळ्यांच्या शर्यतीला तोंड द्यावे लागते. विशेषत: खडेबाजारमध्ये दरबार गल्ली कॉर्नर आणि शितल हॉटेलजवळ वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना अडकून पडावे लागते.
एकेरी वाहतुकीचा रामदेव गल्लीत बोजवारा
समादेवी गल्लीत भाजीवाल्यांनी ठाण मांडल्याने या गल्लीत प्रवेश करताच अडथळ्याच्या शर्यतीस प्रारंभ होतो. भाजी खरेदी करण्यासाठी थांबणारे नागरिक वाहने बाजूलाच लावून खरेदी करीत असतात. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना थांबून राहावे लागते. या परिसरात रुग्णालये, बँका असल्याने वाहने पार्क करून नागरिक निघून जातात. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच समादेवी गल्ली कॉर्नरजवळ मंदिराच्या शेजारी रिक्षाचालक तसेच चार चाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी ट्राफीक जाम होते. सध्या हा रस्ता खूपच गर्दीचा झाला आहे. रामदेव गल्लीत एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. पण काही वाहनधारक सर्व नियम धाब्यावर बसवून एकेरी वाहतूक असतानादेखील जात असतात. त्यामुळे अपघात घडत आहेत.
जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंगमुळे समस्या
शनिवार खुट परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. बाजारपेठेतील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहनधारकांना रिक्षाचालकांना आणि फेरीवाले, भाजीविक्रेत्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न रहदारी पोलीस आणि महापालिकेने केला होता. त्याकरिता ऑड-इव्हन तारखाना पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. याला यश देखील आले होते. पण रहदारी पोलिसांनी या योजनेकडे कानाडोळा केल्याने सध्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली जात आहेत. तसेच फेरीवाले आणि भाजीविक्रेते ठाण मांडत आहेत.









