सांगली / संजय गायकवाड :
महापालिकेचे मुख्यालय, सिटी पोलीस स्टेशन व भारती विद्यापीठाची मुख्य इमारत अशा अत्यंत गजबलेल्या आणि सांगलीतील कापड पेठेसह सर्व बाजारपेठांचे प्रवेशदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटी पोलीस स्टेशनसमोरील चौक रिक्षांच्या गराड्यात अडकला आहे. समोरच महापालिकेचे मुख्यालय असूनही पालिकेसमोरच हातगाड्यांचा विळखा, शनिवारचा आठवडा बाजार आणि पार्कीग रस्त्यावर अशा विचित्र समस्यांच्या भाऊगर्दीमध्ये हा चौक अडकला आहे. या चौकाला रिक्षा आणि हातगाड्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याचे मोठे आव्हान मनपा प्रशासन व वाहतूक पोलीस शाखेसमोर आहे.
सिटी पोलीस स्टेशनसमोरील चौक हा अत्यंत गर्दीचा आणि वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. या चौकातून अनेक मार्ग वेगेवगळ्या दिशेला जातात. सांगली स्टॅन्ड, आयर्विन पुल तसेच कोल्हापूरकडून मिरज, माधवनगरकडे जाणारी व तिकडून येणारी सर्व वाहने ही याच चौकातून पुढे जात असतात. साखर कारखाने सुरू असताना बैलगाडया, ट्रॅक्टर व ट्रक ही ऊस वाहतूक करणारी वाहनेही याच चौकातून पुढे जातात. इस्लामपूर व पलूसच्या दिशेने कर्नाळ पोलीस चौकी जामवाडी, पटेल चौकातून येणारी वाहनेही याच चौकातून पुढे जातात.
सिटी पोलीस ठाण्यासमोर दर शनिवारी भारती विद्यापीठापासून ते मेन रोड, कापड पेठ, टिळक चौक, हरभट रोड ते अगदी गणपती मंदिराच्या कोपऱ्यापासून पांजरपोळपर्यत आडवातिडवा मोठा बाजार भरतो. हा बाजार हलविण्याबाबत अनेकवेळा चर्चा झाली. पण प्रत्यक्षात कारवाई नाही. कापड पेठेसारख्या अत्यंत अरूंद मार्गावर हा बाजार भरतो.
सिटी पोलीस ठाण्यापासून भारती विद्यापीठ व राजवाडा चौकाच्या कोपऱ्यापर्यंत मिरजेकडे जाणाऱ्या असंख्य रिक्षा येथे उभ्या असतात. यामुळे येथे वाहतूकीची मोठी कोंडी होते. वाहतूक पोलीसांनाही येथील रिक्षाचालक जुमानत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. राजवाडा चौकाकडून येणाऱ्या रिक्षा मनपाच्या गेटजवळ पाठीमागून येणारी वाहने न पाहताच अचानक कशाही रिक्षा वळवितात. त्यामुळे या चौकात अपघात व वादावादीचे प्रकार झालेले आहेत. रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.
- बहुमजली पार्कीग संकुल उभारा
पुणे महापालिकेच्यावतीने महात्मा फुले मार्केटसमोर बहुमजली पार्कीग संकुल उभारले आहे. येथे असंख्य चारचाकी गाड्या पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे. त्या धर्तीवर सांगली महापालिकेलाही बाजारपेठांचा विचार करून सांगलीमध्ये मल्टीलेवल पार्कीग संकुल उभारता येईल. या संकुलामध्ये किमान १०० चारचाकी गाड्या उभारण्याची सोय असायला हवी. यामुळे बाजारपेठांतील वाहतूकीची कोंडी कमी होईल. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी याबाबत विचार करायला हरकत नाही.
-केदार खाडिलकर, व्यापारी व भाजपा सोशल मीडिया प्रमुख सांगली








