डॉक्टरांची आवश्यकता कधीही भासू शकते. कुटुंबात कुणी ना कुणी आजारी पडत असतो, अशा स्थितीत घरानजीक डॉक्टर असल्यास मोठी मदत होते. मेक्सिको देशात एक असे शहर आहे, जेथे शेकडो डेंटिस्ट आहेत. या शहरात तुम्हाला डेंटिस्ट शोधावा लागणार नाही, तर तो काही अंतरावरच सापडतो.
मेक्सिकोत लॉस एल्गोडॉन्स नावाचे छोटे शहर आहे. या शहराची लोकसंख्या केवळ 7 हजार आहे. येथे दर चौरस मैल क्षेत्रात एक डेंटिस्ट मिळतो. 7 हजार लोकसंख्येमागे येथे 600 डेंटिस्ट आहेत. यामुळे येथील लोकांना डेंटिस्ट शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत नाही.

मेक्सिकोच्या या शहरात नोव्हेंबरपासुन एप्रिलपर्यंत पर्यटनाचा हंगाम मानला जातो, शेकडो पर्यटक या शहरात फिरण्यासाठी नव्हे तर दातांशी निगडित विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी येत असतात. अमेरिका आणि कॅनडा तसेच ब्रिटनमधून देखील मोठ्या संख्येत लोक येथे येत असतात. या शहरात दातांच्या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी आहे. या शहरात अनेकदा रुग्णांची संख्या वाढल्याने डॉक्टर कमी पडू लागतात. काही काळासाठी येथील लोकसंख्या दुप्पट-तिप्पट होते.
शहराच्या या अनोखेपणामुळे याला मोलर सिटी म्हटले जाते. मोलर सिटीची अधिकृत वेबसाइट तयार करण्यात आली असून याद्वारे पर्यटक वेगवेगळ्या डॉक्टरांशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊ शकतात. या शहराला जगाची डेंटल टूरिझम कॅपिटल देखील म्हटले जाते. मेक्सिकोच्या या शहरात देशातील सर्वोत्तम डेंटिस्ट आढळून येतात.









